वॉशिंग्टन : जगाच्या पाठीवर एक तुरुंग असा आहे ज्याची ओळख 'सर्वात महागडा तुरुंग' अशीच आहे. या तुरुंगात 40 कैदी असून प्रत्येक कैद्यावर दरवर्षी सुमारे 93 कोटी रुपये खर्च होतात. या तुरुंगाचे नाव 'ग्वांतानमो बे जेल'.
हा तुरुंग ग्वांतानमो खाडीच्या तटावर आहे. या तुरुंगात सुरक्षा व्यवस्थेसाठी सुमारे 1800 सैनिक तैनात आहेत. येथील एका कैद्यासाठी 45 सैनिक तैनात असतात. या सैनिकांवरच दरवर्षी सुमारे 3900 कोटी रुपये खर्च होतात. या तुरुंगावर इतका खर्च का केला जातो याचे आपल्याला आश्चर्य वाटू शकते. याचे कारण म्हणजे या तुरुंगात अतिशय खतरनाक असे कैदी ठेवण्यात आलेले आहेत. या तुरुंगात तीन इमारती, दोन गुप्तचर यंत्रणांची मुख्यालये आणि तीन हॉस्पिटल आहेत. याशिवाय येथे वकिलांसाठीही वेगवेगळे कंपाऊंड बनवण्यात आले आहेत. तिथे कैद्यांशी त्यांचे वकील चर्चा करतात. कैद्यांसाठी इथे एक प्रार्थनागृह आणि चित्रपटगृहही आहे. जिम आणि प्ले स्टेशनचीही सुविधा याठिकाणी आहे. ग्वांतानमो हा अमेरिकेच्या नौदलाचा तळ होता. कालांतराने त्याचे रूपांतर डिटेन्शन सेंटरमध्ये करण्यात आले.