‘मोनालिसा’ पेंटिंगची किंमत सात हजार कोटींपेक्षाही अधिक!

युरोपातील पुनर्जागृतीच्या काळाचे एक प्रतीक म्हणूनही या चित्राचे महत्त्व
most expensive paintings
‘मोनालिसा’ पेंटिंगची किंमत सात हजार कोटींपेक्षाही अधिक!File Photo
Published on
Updated on

पॅरिस : बहुमुखी प्रतिभा असलेला हरहुन्नरी कलाकार लिओनार्डो दा विंची याने बनवलेली अजरामर कलाकृती म्हणजे ‘मोनालिसा’. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या लुव संग्रहालयात त्याचे हे पेंटिंग ठेवलेले आहे. लिओनार्डो हा एक चित्रकार, शिल्पकार, संशोधक तसेच स्थापत्य, यंत्र, मानवी शरीररचना, गणित, खगोल यासारख्या अनेक विषयांचा अभ्यासक होता. त्यामुळे त्याचे कोणतेही चित्र हे सामान्य चित्र नसून, त्यामध्ये अनेक गूढ गोष्टी लपलेल्या आहेत, असे म्हटले जाते. ‘मोनालिसा’चे चित्र त्यापैकीच एक आहे. युरोपातील पुनर्जागृतीच्या काळाचे एक प्रतीक म्हणूनही या चित्राचे महत्त्व आहे. अशा या जगप्रसिद्ध कलाकृतीची सध्याची किंमत पाहिली तर आपले डोळे विस्फारू शकतात. हे चित्र सात हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीचे आहे!

ज्या काळात केवळ धार्मिक विषयावरील चित्रेच बनवली जात असत, त्या काळात लिओनार्डोने एका सामान्य स्त्रीचे हे चित्र बनवले. अर्थात ही स्त्री तितकी ‘सामान्य’ नव्हती. लिओनार्डोच्या एका श्रीमंत व्यापारी मित्राची पत्नी असलेल्या लिसा डेल गिओकोंदो या इटालियन महिलेचे हे चित्र असल्याचे म्हटले जाते. अर्थात, लिओनार्डोने हे तैलचित्र कधीही गिओकोंदो कुटुंबाला दिले नाही. इसवी सन 1503 ते 1506 या काळात त्याने हे चित्र बनवल्याचे मानले जाते. मात्र सन 1517 पर्यंत लिओनार्डो या चित्रावर काम करीतच होता. फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला याने लिओनार्डोच्या मृत्यूनंतर सन 1519 मध्ये हे चित्र घेतले. आता हे चित्र फ्रान्सची अनमोल संपत्ती आहे. सन 1797 पासून मोनालिसा चित्र पॅरिसच्या लुव संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवलेले आहे. जगभरातील लोक खास हे चित्र पाहण्यासाठी लुव संग्रहालयाला भेट देतात. 21 ऑगस्ट 1911 मध्ये हे पेंटिंग चोरीला गेले होते. दोन वर्षांपेक्षा अधिक काळानंतर म्हणजे 11 डिसेंबर 1913 मध्ये ते पुन्हा सापडले. मोनालिसा चित्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे गूढ हास्य. या हास्यावरच अनेक संशोधने झालेली आहेत. वेगवेगळ्या अँगलमधून किंवा पाहणार्‍याच्या मूडनुसारही तिचे हास्य वेगळे दिसते, असे म्हटले जाते. सध्याच्या घडीला या पेंटिंगची किंमत सुमारे 7 हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचे म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news