

लंडन : जगभरात चीज आणि पनीरचे असंख्य प्रकार आढळतात; पण कधी तुम्ही विचार केला आहे का की, सर्वात महागडे चीज कोणते असेल आणि त्याची किंमत किती असू शकते? अलीकडेच यासंदर्भात एक नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे.
साधारणतः चीज किंवा पनीर तुम्हाला 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान सहज मिळू शकते. मात्र, जगात एक असं चीज आहे, ज्याची किंमत तब्बल लाखोंमध्ये आहे. कॅब्रालेस नावाचे हे खास चीज तब्बल 10 महिने गुहेत ठेऊन विकसित करण्यात आले होते. अलीकडेच या चीजचा लिलाव झाला आणि त्याची खरेदी तब्बल 42,232 डॉलर्स म्हणजेच सुमारे 35 लाख रुपयांमध्ये करण्यात आली. सुमारे 2.3 किलो वजन असलेले हे चीज गायीच्या दुधापासून तयार करण्यात आले होते.
याचे वैशिष्ट्य असे की, ते समुद्रसपाटीपासून सुमारे 5,000 फूट उंचीवर असलेल्या लॉस माजोस या गुहेत 10 महिन्यांपर्यंत परिपक्व केले गेले होते. या विशिष्ट गुहांतील आर्द्रता आणि नियंत्रित तापमानामुळे चीजला एक वेगळी चव आणि खास सुगंध प्राप्त होतो. कॅब्रालेस चीज गाय, बकरी आणि मेंढीच्या दुधाच्या मिश्रणातून तयार केले जाते. ही विशेष प्रक्रिया चीजला हिरवट-निळसर पोत आणि वेगळा स्वाद देते.