

वॉशिंग्टन : मंगळावर आजपर्यंत विविध पशुपक्ष्यांच्या आणि अगदी माणसाच्याही आकाराचे खडक किंवा भूरचना दिसलेल्या आहेत. अर्थातच हा एक आभास असतो. आता नासाच्या पर्सेव्हेरन्स रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर एका कासवासारख्या खडकाचे एक मनोरंजक छायाचित्र टिपले आहे. हा खडक पाहिल्यानंतर असे वाटते की, तो आपले डोके कवचातून बाहेर काढत आहे. मंगळावरील सजीव प्राण्यांसारख्या किंवा पृथ्वीवरील वस्तूसारख्या दिसणार्या खडकांच्या यादीत आता या नवीन शिल्पाची भर पडली आहे.
पर्सेव्हेरन्सने हे नवीन छायाचित्र 31 ऑगस्ट रोजी, मंगळावरील त्याच्या 1610 व्या सोलर दिवशी (मंगळावरील दिवस) काढले. एखाद्या कारच्या आकाराचा हा रोव्हर 2021 मध्ये 45 किलोमीटर (28 मैल) रुंद असलेल्या जेझेरो क्रेटरमध्ये उतरला होता. असे मानले जाते की, या ठिकाणी पूर्वी एक मोठे सरोवर होते. या क्रेटरमध्ये फिरत असताना रोव्हरने हे छायाचित्र घेतले. हे छायाचित्र रोव्हरवरील ‘स्कॅनिंग हॅबिटेबल एन्व्हायरमेंटस् विथ रामन अँड ल्युमिनेसेन्स फॉर ऑरगॅनिक्स अँड केमिकल्स’ (SHERLOC) आणि ‘वाईड अँगल टोपोग्राफिक सेन्सर फॉर ऑपरेशन्स अँड इंजिनिअरिंग’ (WATSON) या उपकरणांच्या मदतीने घेण्यात आले आहे.
या दोन्ही उपकरणांनी मिळून द़ृश्यमान आणि अतिनील तरंगलांबीच्या प्रकाशात या खडकाला स्कॅन केले. ही दोन्ही उपकरणे रोव्हरच्या रोबोटिक आर्म टरेटवर बसवलेली आहेत. छायाचित्रातील या खडकाची तुलना कासवाशी केली जात आहे, कारण त्यात डोके आणि दोन डोळ्यांसारखे दिसणारे भाग आहेत, जे एका संरक्षणात्मक ‘कवचातून’ बाहेर आलेले वाटतात. हा खडक अशा असामान्य आकारात कसा तयार झाला, हे सध्या स्पष्ट झालेले नाही.
मंगळावर पाठवलेल्या रोव्हर्सनी आतापर्यंत हजारो छायाचित्रे काढली आहेत. यापैकी बहुतेक छायाचित्रांमध्ये अनेक खडक आणि इतर भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये दिसतात. ही वैशिष्ट्ये प्राचीन जलस्रोतांमुळे किंवा हजारो वर्षांच्या जोरदार वार्यांमुळे अशा विशिष्ट आकारात तयार झाली असावीत. कधीकधी या खडकांपैकी एखादा खडक आपल्याला पृथ्वीवर दिसणार्या एखाद्या वस्तूसारखा दिसतो, जसे की ब्ल्यूबेरीज, मानवी बोटांचे ठसे, एक रहस्यमय दरवाजा आणि अगदी ‘स्टार ट्रेक’चे चिन्हही!