

वॉशिंग्टन : केवळ 70 वर्षांपूर्वी अवकाश युगाची सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीभोवती अवघे काही मोजकेच मानवनिर्मित उपग्रह फिरत होते; मात्र आज, 2025 सालच्या मे महिन्यापर्यंत, तब्बल 11,700 सक्रिय उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत आहेत. याशिवाय अनेक उपग्रह प्रक्षेपणाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे ही संख्या दिवसागणिक वाढतेच आहे.
1957 साली रशियाने ‘स्पुटनिक’ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह अंतराळात सोडल्यानंतर 2010 च्या दशकापर्यंत दरवर्षी 50 ते 100 उपग्रह अंतराळात सोडले जात होते; पण खासगी अंतराळ कंपन्यांच्या उदयामुळे, विशेषतः ‘स्पेस एक्स’सारख्या कंपन्यांमुळे, गेल्या काही वर्षांत उपग्रह प्रक्षेपणांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. 2024 मध्ये दर 34 तासांनी एक रॉकेट प्रक्षेपित होत होते आणि एकाच वर्षात 2,800 हून अधिक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवण्यात आले.
आजच्या घडीला अंतराळात असलेल्या उपग्रहांपैकी बहुतांश म्हणजे 7,400 हून अधिक उपग्रह स्पेस एक्सच्या ‘स्टारलिंक’ प्रकल्पाशी संबंधित आहेत. हे एकाच कंपनीचे उपग्रह असून ते संपूर्ण जगाला इंटरनेट सेवा पुरवण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आले आहेत. ही एकप्रकारे ‘मेगाकॉन्स्टेलेशन‘ म्हणजेच हजारो उपग्रहांचे एक महाजाळे असून यामुळे भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये खगोलशास्त्रावर होणारे परिणाम, अंतराळातील कचर्याची वाढ आणि इतर उपग्रह किंवा माणसांच्या अंतराळ मोहिमांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अंतराळ व्यवहार कार्यालयाच्या माहितीनुसार, निष्क्रिय किंवा ‘ग्रेव्हयार्ड ऑर्बिट‘मध्ये गेलेल्या उपग्रहांनाही धरल्यास ही संख्या सुमारे 14,900 पर्यंत जाते. विशेष म्हणजे ही फक्त सुरुवात आहे. तज्ज्ञांच्या मते ही संख्या पुढील काही वर्षांत दहा पटीनं वाढू शकते. SpaceX व्यतिरिक्त OneWeb, AST SpaceMobile, Amazon चं Project Kuiper आणि "Thousand Sails‘ प्रकल्प देखील मोठ्या प्रमाणावर उपग्रह प्रक्षेपित करत आहेत.