

वॉशिंग्टन : चंद्र म्हटले की, पृथ्वीभोवती अव्याहतपणे प्रदक्षिणा घालणारा आपला एकमेव सोबती डोळ्यांसमोर येतो. मात्र, एका ताज्या संशोधनाने हा समज बदलून टाकला आहे. यानुसार, पृथ्वीभोवती एकाच वेळी किमान 6 ‘छोटे चंद्र’ (मिनिमून्स) फिरत असू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी अनेक छोटे चंद्र दुसरे-तिसरे कुणी नसून आपल्याच चंद्राचे तुटलेले तुकडे आहेत, जे उल्कापिंडांच्या धडकेमुळे अंतराळात फेकले गेले आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अडकले.
हे ‘मिनिमून्स’ म्हणजे असे लहान खडक आहेत, जे तात्पुरते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अडकतात आणि तिची परिक्रमा करू लागतात. काही काळानंतर ते या कक्षेतून बाहेर पडून पुन्हा सूर्याभोवती फिरू लागतात. त्यांचा आकार (साधारणपणे 1 ते 2 मीटर व्यास) आणि प्रचंड वेग यामुळे त्यांना शोधणे अत्यंत कठीण असते. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा समज होता की, हे छोटे चंद्र मंगळ आणि गुरू ग्रहांच्या मध्ये असलेल्या लघुग्रह पट्ट्यातून (अॅस्टरॉईड बेल्ट) येतात. मात्र, नव्या सिद्धांतानुसार यापैकी बरेचसे तुकडे आपल्याच चंद्रावरून आलेले असू शकतात. जेव्हा एखादी मोठी उल्का चंद्रावर आदळते, तेव्हा त्या टक्करीमुळे चंद्राचे अनेक तुकडे प्रचंड वेगाने अंतराळात फेकले जातात. यातील काही तुकडे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत सापडतात आणि तिचे ‘तात्पुरते चंद्र’ बनून फिरू लागतात. हवाई विद्यापीठातील संशोधक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक रॉबर्ट जेडिक यांनी या प्रक्रियेचे वर्णन एका ‘स्क्वेअर डान्स’ सारखे केले आहे. ते म्हणतात, ‘हा एक प्रकारचा असा डान्स आहे, जिथे सोबती (मिनिमून्स) नियमितपणे बदलत राहतात आणि कधी कधी काही काळासाठी डान्स फ्लोअर (पृथ्वीची कक्षा) सोडून जातात.’