

नवी दिल्ली : ‘मूड स्विंग्स’ हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर सहसा महिलाच येतात. मासिक पाळी किंवा हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये भावनिक चढ-उतार होतात, हा एक सर्वमान्य समज आहे; पण हाच भावनिक गोंधळ पुरुषांमध्येही होतो, ही वस्तुस्थिती अनेकदा दुर्लक्षित केली जाते. पुरुषांच्या मूड स्विंग्सला ‘चिडचिडेपणा’ किंवा ‘राग’ समजून त्याकडे कानाडोळा केला जातो.
खरे तर, मूड स्विंग्स हा एक सार्वत्रिक मानवी अनुभव आहे आणि पुरुषही याला अपवाद नाहीत. शारीरिक, हार्मोनल आणि मानसिक कारणांमुळे त्यांच्यातही भावनिक चढ-उतार येतात, जे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर खोलवर परिणाम करतात. पुरुषांमधील मूड स्विंग्समागे अनेक शारीरिक आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. टेस्टोस्टेरॉनची घट हे सर्वात प्रमुख कारण आहे. विशेषतः, वयाच्या तिशीनंतर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या हार्मोनची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे चिडचिड, थकवा आणि नैराश्य यासारखी लक्षणे दिसू शकतात. या स्थितीला ‘अँड्रोपॉज’ असेही म्हणतात.
कामाचा दबाव, आर्थिक चिंता आणि कौटुंबिक जबाबदार्यांमुळेही तणावाची पातळी वाढते, ज्यामुळे मूडमध्ये वारंवार बदल होतात. पुरेशी झोप न मिळाल्यास हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. खराब आहार, मद्यपानाचे अतिसेवन आणि बैठी जीवनशैली या समस्येला आणखी वाढवू शकते. पुरुषांमधील मूड स्विंग्सची लक्षणे अनेकदा महिलांपेक्षा वेगळ्या प्रकारे दिसून येतात.
महिलांमध्ये उदासी किंवा रडण्याचे प्रमाण जास्त दिसू शकते, तर पुरुषांमध्ये ते चिडचिड आणि अचानक राग येणे, सततचा थकवा, पूर्वी आवडणार्या गोष्टींमध्ये किंवा कामांमध्ये मन न लागणे, झोप न लागणे किंवा खूप जास्त झोप येणे, कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, भूक कमी लागणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खाणे अशा लक्षणांमधून दिसते. जर कोणामध्ये ही लक्षणे सातत्याने दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.