

लखनौ : माकडं किंवा सीगलसारख्या काही पक्ष्यांकडून माणसाच्या हातातील वस्तूंवर डल्ला मारण्याचा प्रकार काही नवा नाही. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाच्या बाईकच्या डिक्कीत ठेवलेल्या 500 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशवीसह एक माकड झाडावर चढले. माकडाने पिशवी फाडली आणि नोटा खाली फेकायला सुरुवात केली, ज्यामुळे रस्त्यावर ‘नोटांचा पाऊस’ सुरू झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
ही घटना प्रयागराजच्या सोरांव तालुक्यातील आजाद सभागृहाजवळ घडली. रजिस्ट्री करण्यासाठी एक तरुण आपली बाईक थांबवून काही अंतरावर गेला होता. बाईकच्या डिग्गीत प्लास्टिकच्या पिशवीत 500 रुपयांच्या नोटा ठेवल्या होत्या. यावेळी एक माकड पिशवी काढून झाडावर चढले. लोकांनी माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याला थांबवू शकले नाही. लोकांनी पिशवी परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण माकडाने ती फाडली. पिशवी फाडल्यावर माकडाने नोटा खाली फेकायला सुरुवात केली.
तालुक्यात उपस्थित लोक हे द़ृश्य पाहून आश्चर्यचकित झाले आणि आवाज करताना नोटा जमिनीवर पडल्या. लोकांनी त्या नोटा जमिनीवरून उचलायला सुरुवात केली. पडलेल्या सर्व 500 रुपयांच्या नोटा लोकांनी जमिनीवरून उचलून त्या तरुणाला परत दिल्या, जो रजिस्ट्रीसाठी आला होता. पैसे परत मिळाल्याने त्याच्या जीवात जीव आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.