

रोम : आपले गूढ हास्य आणि खोलीत कुठूनही पाहिले तरी रोखून पाहणारे डोळे यामुळे जगप्रसिद्ध ठरलेली ‘मोनालिसा’ ही कलाजगताच्या इतिहासातील सर्वाधिक अभ्यासली गेलेली कलाकृती मानली जाते. मात्र, आता एका नव्या संशोधनातून या चित्राबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. संशोधकांच्या मते, मोनालिसाच्या चेहऱ्यावर एका असाध्य केस गळतीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे दिसून येत आहेत.
इटलीतील महान चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी १६ व्या शतकात फ्लोरेन्स येथील रेशीम व्यापाऱ्याची २४ वर्षीय पत्नी लिसा घेरार्दिनी हिचे हे तैलचित्र रेखाटले होते. या चित्राच्या सूक्ष्म तपासणीनंतर संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, ती ‘अलोपेसिया एरियाटा’ (Alopecia Areata) या आजाराच्या प्राथमिक टप्प्यातून जात होती. हा असा आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणाच टाळूवरील केसांच्या मुळांवर हल्ला करते, ज्यामुळे केस अत्यंत वेगाने आणि पूर्णपणे गळू लागतात. रोम येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ डर्मेटॉलॉजी अँड ट्रायकोलॉजी’चे डॉ. लुइगी लैनो यांच्या मते, मोनालिसाच्या चेहऱ्यावरील भुवया आणि पापण्यांचा अभाव, तसेच कपाळावरून मागे सरकलेली केसांची रेष (रेसिडिंग हेअरलाईन) हे ती टक्कल पडण्याच्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
ब्रिटनमध्ये या आजाराने सुमारे ४ लाख लोक प्रभावित असून, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. विशेषतः, २५ ते २९ या वयोगटात हा आजार अधिक बळावताना दिसतो. दा विंची यांनी १५१९ मध्ये पूर्ण केलेल्या या कलाकृतीचा यापूर्वी जेव्हा अभ्यास करण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन फॅशननुसार भुवया आणि पापण्या काढण्याची पद्धत होती, असे मानले गेले होते. मात्र, डॉ. लैनो यांनी हा दावा खोडून काढला आहे. अलोपेसिया हा आजार मानसिक ताण आणि संप्रेरकांमधील (हार्मोनल) बदलांमुळे उद्भवू शकतो. यासंदर्भात नोंदवताना डॉ. लैनो म्हणाले की, अवघ्या १५ व्या वर्षी झालेले लग्न, दोन मुलांचा मृत्यू आणि त्या काळात पसरलेल्या प्लेगच्या साथीची सततची भीती अशा प्रचंड मानसिक ताणातून मोनालिसा गेली होती. ‘क्लिनिक्स इन डर्मेटॉलॉजी’ या वैद्यकीय नियतकालिकात लिहिताना डॉ. लैनो यांनी नमूद केले, ‘कला इतिहासातील सर्वात गूढ आणि सर्वाधिक अभ्यासल्या गेलेल्या या चेहऱ्याची वैद्यकीय वस्तुस्थिती आता स्वीकारली जावी. हे चित्र प्रत्यक्षात अलोपेसिया एरियाटा या आजाराने ग्रस्त असलेल्या एका तरुण महिलेचे वास्तव मांडते.’