

वॉशिंग्टन: आपल्या पेशींना ऊर्जा पुरवणारे ‘पॉवरहाऊस’ म्हणून ओळखले जाणारे ‘माईटोकॉन्ड्रिया’ केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत, तर ते आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे एक महत्त्वाचे सैनिकही आहेत, हे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, हे लहान पेशी-अंगक थेट बॅक्टेरियाच्या म्हणजेच जीवाणूंच्या हालचाली ओळखतात आणि त्यांना जाळ्यात अडकवून मारण्यासाठी रोगप्रतिकारक पेशींना मदत करतात. या महत्त्वपूर्ण शोधामुळे ल्युपससारख्या ऑटोइम्यून आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना संसर्गाशी लढण्यात का अडचणी येतात, यावरही नवीन प्रकाश पडला आहे.
आपल्या शरीरातील रोगप्रतिकार प्रणालीचे ‘फर्स्ट रिस्पॉन्डर्स’ म्हणून न्यूट्रोफिल्स या पांढर्या रक्त पेशी ओळखल्या जातात. संसर्ग झाल्यास त्या सर्वात आधी घटनास्थळी पोहोचतात. त्यांचे संरक्षणाचे एक प्रमुख शस्त्र म्हणजे ‘न्यूट्रोफिल एक्स्ट्रासेल्युलर ट्रॅप्स’ (छएढी) नावाचे जाळे तयार करणे. हे जाळे डीएनए आणि अँटीमायक्रोबियल प्रथिनांपासून बनलेले असते. या चिकट जाळ्यात शरीरात घुसखोरी करणारे सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) अडकतात आणि नष्ट होतात, ज्यामुळे शरीरात त्यांचा प्रसार रोखला जातो.
आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा समज होता की, पेशींवरील ताण किंवा नुकसानीमुळेच हे जाळे तयार होते. मात्र, ताज्या संशोधनात असे दिसून आले आहे की, माईटोकॉन्ड्रिया थेट बॅक्टेरियाद्वारे तयार होणारा ‘लॅक्टेट’ नावाचा एक विशिष्ट घटक ओळखतात आणि हाच संकेत वापरून छएढी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतात. लॅक्टेट हा घटक सामान्यतः मानवांमध्ये स्नायूंच्या थकव्याशी संबंधित आहे. परंतु, बॅक्टेरियाच्या संसर्गाच्या बाबतीत त्याची भूमिका वेगळी असते. अनेक बॅक्टेरिया ऊर्जानिर्मितीसाठी लॅक्टेट बाहेर टाकतात. जेव्हा न्यूट्रोफिल पेशी बॅक्टेरियाला गिळंकृत करतात, तेव्हा माईटोकॉन्ड्रिया या लॅक्टेटच्या उपस्थितीला ओळखतात आणि धोक्याचा इशारा देऊन छएढी तयार करण्यासाठी पेशीला उद्युक्त करतात.