

वॉशिंग्टन : संशोधकांनी एक अशी गिळण्यायोग्य कागदी बॅटरी तयार केली आहे, जी शरीराच्या आतील वैद्यकीय उपकरणांना ऊर्जा देऊ शकते आणि तिचे काम संपल्यानंतर हळूहळू वितळून नष्ट होते. आत्तापर्यंत या बॅटरीची चाचणी केवळ डुकरांवर करण्यात आली आहे, जिथे तिने तीन दिवसांपर्यंत उपकरणांना ऊर्जा पुरवली. जर ही बॅटरी मानवासाठी सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झाली, तर भविष्यात ती आतड्यांमधील तात्पुरत्या उपकरणांना ऊर्जा देऊ शकेल. यामुळे काम झाल्यावर पारंपरिक बॅटरी काढण्यासाठी करावी लागणारी शस्त्रक्रिया टाळता येईल.
या अभ्यासात सहभागी नसलेले युनिव्हर्सिटी ऑफ मॅरिलँडचे इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे प्राध्यापक रेझा घोडसी म्हणाले, मी या संशोधनाबद्दल खूप उत्सुक आहे. गिळण्यायोग्य उपकरणांमध्ये बॅटरी ही अशी एक गोष्ट आहे, जी सर्वात जास्त जागा व्यापते. त्यामुळे कॅप्सूलचा आकार लहान करून आवश्यक ती ऊर्जा देणारा कोणताही शोध खूप आशादायक आहे. गिळण्यायोग्य वैद्यकीय उपकरणांच्या उदाहरणांमध्ये अंतर्गत रक्तस्राव शोधणारी, औषधे पोहोचवणारी किंवा विशिष्ट ऊतींना व अवयवांना उत्तेजित करणारी उपकरणे समाविष्ट आहेत. गिळण्यायोग्य उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक बॅटऱ्या केवळ आकाराने मोठ्या नसतात, तर त्यातील रसायने बाहेर पडून शरीराला इजा होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे सील करून ठेवावे लागते. नेचर केमिकल इंजिनिअरिंग या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या नवीन बॅटरीची रचना अशा घटकांपासून केली आहे, जे अन्ननलिकेतील आणि आतड्यांतील आम्लामध्ये हळूहळू वितळतात. काम झाल्यावर कोणतेही विषारी अवशेष न सोडता ते शरीरात सुरक्षितपणे शोषले जातात.
ही बॅटरी वेगवेगळ्या थरांमध्ये बनवली आहे. यामध्ये मॅग्नेशियम अलॉयचा वापर ॲनोड (ऋण टोक) म्हणून केला आहे, तर कॅथोड (धन टोक) मध्ये मोलिब्डेनम ट्रायऑक्साईड (Molybdic Trioxide) आणि ॲक्टिव्हेटेड कार्बन आहे. या दोन्ही बाजूंच्या मध्ये एक बायोडिग्रेडेबल (जैविकदृष्ट्या विघटनशील) इलेक्ट्रोलाईट आहे, ज्यामुळे बॅटरीमध्ये वीज निर्माण होते. यापूर्वीच्या तात्पुरत्या वैद्यकीय आणि वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या बायोडिग्रेडेबल बॅटऱ्यांमध्येही याच पदार्थांचा वापर केला गेला होता. या नवीन डिझाईनमध्ये ‘सेल्युलोज नॅनोफायब्रिल्स’चा वापर करून त्यांना पातळ, सच्छिद्र आणि कागदासारख्या बॅटरीमध्ये रूपांतरित केले गेले आहे, तर पूर्वीच्या मॉडेल्समध्ये मोठ्या बाईंडर्सचा वापर केला जात असे.