

वॉशिंग्टन : मानव आता केवळ चंद्रावर पाऊल ठेवण्यापुरता मर्यादित राहिला नसून, चंद्राला भविष्यातील ‘ऊर्जा केंद्र’ म्हणून पाहिले जात आहे. इस्रो आणि नासासारख्या अंतराळ संस्थांच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, चंद्राच्या पृष्ठभागाखाली आणि मातीत अशा मौल्यवान खनिजांचा साठा आहे, जो पृथ्वीवरील अनेक संकटांना कायमचे दूर करू शकतो.
चंद्रावर आढळणारे सर्वात महत्त्वाचे खनिज म्हणजे ‘हेलियम-3’. पृथ्वीवर हे अत्यंत दुर्मीळ आहे; परंतु चंद्रावर त्याचे लाखो टन साठे उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, हेलियम-3 चा वापर करून अणुऊर्जा निर्माण केल्यास कोणताही किरणोत्सर्गी कचरा तयार होणार नाही. केवळ 25 टन हेलियम-3 अमेरिकेसारख्या देशाची वर्षभराची ऊर्जेची गरज पूर्ण करू शकते. स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने आणि प्रगत संरक्षण उपकरणांसाठी लागणारे ‘लँथॅनम’, ‘निओडायमियम’ यांसारखे 17 प्रकारचे दुर्मीळ धातू चंद्रावर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सध्या या धातूंसाठी जग एका विशिष्ट देशावर अवलंबून आहे; परंतु चंद्रावरील खाणकाम या क्षेत्रातील समीकरणे बदलू शकते.
चंद्रावर ‘प्लॅटिनम ग्रुप’मधील धातूंचे मोठे साठे असण्याची दाट शक्यता आहे. यात सोने, चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियमचा समावेश होतो. हे धातू केवळ दागिन्यांसाठीच नव्हे, तर इलेक्ट्रॉनिक आणि औद्योगिक उपकरणांसाठी अत्यंत मौल्यवान आहेत. चंद्रावर ‘इल्मेनाइट’ नावाचे खनिज मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यातून टायटॅनियम आणि लोह मिळवता येते. टायटॅनियम हा पोलादापेक्षा मजबूत पण वजनाला हलका असल्याने अंतराळयाने आणि विमाने बनवण्यासाठी तो सर्वोत्तम मानला जातो. अंतराळ शास्त्रज्ञांच्या मते, चंद्रावरील या नैसर्गिक संपत्तीचा वापर करण्यासाठी सध्या ‘मून मायनिंग’ तंत्रज्ञानावर वेगाने काम सुरू आहे. येत्या काही दशकांत चंद्र हा केवळ पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह न राहता पृथ्वीसाठी एक मोठी ‘खाण’ ठरू शकतो.