

लंडन : निसर्गामध्ये इतकी खजिने दडलेली आहेत की, ती अनेक शतकांपासून मानवाला थक्क करीत आली आहेत. आता जगातील सर्वात मोठा महासागर असलेल्या पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरात एक आश्चर्यकारक घटनाक्रम पाहिला आहे. वैज्ञानिकांनी पाहिले की, महासागरात काही धातूंचे खडक किंवा खनिजे कोणत्याही प्रकाशाशिवायच गडद अंधारात ऑक्सिजनची निर्मिती करीत आहेत. वैज्ञानिकांनी त्याला ‘डार्क ऑक्सिजन’ असे नाव दिले आहे.
हे अतिशय आश्चर्यकारक असेच आहे. याचे कारण म्हणजे, आतापर्यंत असेच मानले जात होते की, ऑक्सिजनची निर्मिती केवळ प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून सूर्यप्रकाशातच होते. त्यामुळे समुद्राच्या तळाशी गडद अंधारात ऑक्सिजन कसा निर्माण होतो, याचे कुतूहल संशोधकांना आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, समुद्रात हजारो फूट खोलीवर आढळणारे बटाट्याच्या आकाराचे धातूंचे खडक सागरी पाण्याच्या अणूंना तोडतात आणि मग ऑक्सिजनची निर्मिती करतात. सतराव्या शतकापासूनच वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेनेच ऑक्सिजनची निर्मिती होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकली. वनस्पती, शैवाल आणि काही बॅक्टेरिया कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याला ग्लुकोज व ऑक्सिजनमध्ये बदलण्यासाठी सूर्यप्रकाश अवशोषित करतात.
सोप्या शब्दांमध्ये सांगायचे, तर प्रकाशाचा वापर आपला निसर्ग इंधनासारखा करतो, जेणेकरून प्रत्येक जीवाला ऑक्सिजनचा सातत्याने पुरवठा होत राहील. प्रकाश संश्लेषण जीवांना ऊर्जाच देते, असे नाही; तर वातावरणात ऑक्सिजनही सोडत असते. त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून राहते. आतापर्यंत याची कल्पनाही करण्यात आली नव्हती की, प्रकाशाशिवायही ऑक्सिजनची निर्मिती शक्य आहे. मात्र, प्रशांत महासागरात क्लेरियन-क्लिपर्टन झोनमध्ये कोबाल्ट व निकेलसारख्या धातूंच्या अस्तित्वाची शक्यता आहे. खोल समुद्रामध्ये खाणकाम करणार्या कंपन्या नेहमी धातूंचा शोध घेत असतात. अशाच शोधादरम्यान समुद्रतळाशी असलेल्या फेरोमँगेनिज पिंडांचा छडा लागला. फेरोमँगेनिज नोड्यूल हे छोट्या खजिन्याच्या खडकांसारखे असतात, जे समुद्रतळाशी असतात. त्यामध्ये मँगेनिज आणि लोहसारखे धातू असतात. हे नोड्यूल लाखो वर्षांच्या काळात हळूहळू बनतात. संशोधकांना वाटते की, हे नोड्यूल विद्युतभारही निर्माण करू शकतात, जो इलेक्ट्रोलिसिसला उत्तेजन देतो. त्यामुळे ऑक्सिजन व हायड्रोजन निर्माण होतात. स्कॉटिश असोसिएशन फॉर मरीन सायन्सचे अँर्ड्यू स्वीटमन यांनी तीन वर्षांपूर्वी एक प्रोजेक्ट सुरू केला आहे, ज्यामध्ये प्रकाशाशिवायच हे नोड्यूल ऑक्सिजन कसे बनवतात, हे पाहिले जाईल.