Natural Sugar in Space | ब्रह्मांडात सापडला ‘गोडवा’

आकाशगंगेच्या केंद्रस्थानी स्ट्रॉबेरी-रॅस्पबेरीमधील ‘साखर’!
Natural Sugar in Space |
Natural Sugar in Space | ब्रह्मांडात सापडला ‘गोडवा’
Published on
Updated on

माद्रिद : विज्ञानाच्या जगात नेहमीच नवनवीन आणि आश्चर्यकारक शोध लागत असतात. असाच एक थक्क करणारा शोध अलीकडेच खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानाजवळ असलेल्या धूळ आणि वायूच्या महाकाय ढगांमध्ये शास्त्रज्ञांना चक्क नैसर्गिक साखरेचे अंश सापडले आहेत! ही तीच साखर आहे जी रॅस्पबेरी आणि इतर काही फळांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते. अंतराळातील या 'गोड' शोधामुळे शास्त्रज्ञांमध्ये प्रचंड उत्साह पसरला असून, पृथ्वीपलीकडे जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले घटक अस्तित्वात असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

स्पेनच्या 'सेंटर फॉर ॲस्ट्रोबायोलॉजी'च्या संशोधकांनी या साखरेचा शोध लावला आहे. या साखरेला 'इरिथ्र्युलोज' असे म्हणतात, जी चार कार्बन अणूंनी बनलेली असते. आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी, पेशींची रचना मजबूत करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे टडीएनए व आरएनए सारख्या अनुवांशिक घटकांच्या निर्मितीसाठी साखरेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. स्पेनमधील दोन मोठ्या रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने आकाशगंगेच्या केंद्राजवळील 'जी+०.६९३−०.०२७' नावाच्या आण्विक ढगाचा अभ्यास करून हा शोध लावण्यात आला आहे.

वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर, प्रयोगशाळेतील इरिथ्र्युलोजच्या लहरींच्या पॅटर्नशी अंतराळातून मिळालेल्या रेडिओ लहरींची तुलना करून या साखरेची ओळख पटवण्यात आली. खगोलशास्त्रातील जुन्या समजुतींनुसार, अंतराळात जटिल रेणू हळूहळू एकामागून एक कार्बन अणू जोडून तयार होतात. मात्र, तारे किंवा ग्रह तयार होण्यापूर्वीच अंतराळात इतकी जटिल साखर तयार होऊ शकते, हे या शोधाने सिद्ध केले आहे, जे अत्यंत अनपेक्षित होते. याआधी अंतराळात ३४० हून अधिक विविध रेणू सापडले आहेत, पण अंतराळातील मोकळ्या जागेत साखर सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, आपल्या सौरमंडळाची निर्मिती होत असतानाच येथे आधीपासून अस्तित्वात असलेले सेंद्रिय घटक पसरले असावेत.

पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली, हा शास्त्रज्ञांसाठी नेहमीच एक मोठा प्रश्न राहिला आहे. प्रयोगशाळेतील प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की, पृथ्वीच्या सुरुवातीच्या अत्यंत कठीण वातावरणात साखरेचे रेणू इतक्या सहजपणे तयार होऊ शकत नव्हते. त्यामुळे ही साखर अंतराळातूनच पृथ्वीवर आली असावी, या तर्काला आता बळ मिळाले आहे. सुमारे ४ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात लघुग्रहांचा (Asteroids) वर्षाव होत होता, त्या काळात लाखो टन साखर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आली असण्याची शक्यता आहे.

रॅस्पबेरीमध्ये अल्प प्रमाणात आढळणारी ही इरिथ्र्युलोज साखर आजकाल सौंदर्यप्रसाधनांमध्ये, विशेषतः त्वचा टॅन करण्यासाठी वापरली जाते. आता हीच सौंदर्यवर्धक आणि गोड साखर अंतराळातील जीवसृष्टीच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी एक नवा मार्ग दाखवत आहे. हा शोध म्हणजे केवळ अंतराळातील साखरेचा शोध नसून, विश्वात आपण एकटे नाही आहोत, या आशेला दिलेली नवी पालवी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news