

सिएटल : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक नवीन क्वांटम कॉम्प्युटिंग चिप सादर केली आहे. या चिपमधील क्वांटम बिट्स (क्यूबिट्स) आपल्या आधीच्या मॉडेलपेक्षा तब्बल १,००० पटीने अधिक काळ आपली क्वांटम स्थिती टिकवून ठेवण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मायक्रोसॉफ्टच्या मते, या यशामुळे २०२९ पर्यंत व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी क्वांटम कॉम्प्युटर्स बनवण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, कंपनीच्या या मोठ्या दाव्यावर वैज्ञानिक जगतातून शंका उपस्थित केली जात असून, हा प्रोसेसर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
मायक्रोसॉफ्टने या प्रायोगिक क्वांटम प्रोसेसिंग युनिटला ‘मेजोराना २’ असे नाव दिले आहे. या चिपमध्ये ४-क्यूबिटचा अॅरे असून, तिचा सरासरी ‘क्यूबिट जीवनकाळ’ (Mean Qubit Lifetime) २० सेकंद आहे, तर काही प्रकरणांमध्ये तो १ मिनिटापर्यंत नोंदवला गेला आहे. साधारणपणे क्वांटम कॉम्प्युटर्समध्ये क्यूबिट्सचा जीवनकाळ हा केवळ ‘मिलिसेकंद’ (सेकंदाचा हजारावा भाग) इतकाच मोजला जातो. त्या तुलनेत २० सेकंद किंवा १ मिनिटाचा काळ हा क्वांटम विज्ञानाच्या जगात एक खूप मोठी झेप मानली जात आहे. यामुळे क्यूबिट्स जास्त काळ एकमेकांत गुंतून राहू शकतील आणि क्लिष्ट गणिते समांतरपणे सोडवू शकतील. सोप्या शब्दांत सांगायचे तर हा बदल म्हणजे मोबाईलची बॅटरी जी आधी फक्त १ दिवस चालायची, ती आता थेट ३ वर्षे चालेल, अशा क्रांतीसारखा आहे.
मायक्रोसॉफ्टच्या ‘क्वांटम’ विभागाचे कॉर्पोरेट व्हाईस प्रेसिडेंट झुल्फी आलम यांच्या मते, या अभूतपूर्व विश्वासार्हतेमुळे आणि केवळ १ मायक्रोसेकंदच्या कार्यवेगामुळे कंपनीने क्वांटम कॉम्प्युटर बनवण्याचा आपला नियोजित कालावधी थेट अर्ध्यावर आणला आहे. या चिपच्या निर्मितीमध्ये मायक्रोसॉफ्टच्या ‘मायक्रोसॉफ्ट डिस्कव्हरी’ या ‘एजंटिक एआय’ (स्वायत्त कृत्रिम बुद्धिमत्ता) प्लॅटफॉर्मचा मोठा वाटा आहे. डेन्मार्कमधील मायक्रोसॉफ्टच्या लॅबमध्ये शास्त्रज्ञांनी भौतिकशास्त्र, मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा अनेक शाखांमधील अथांग डेटाचे विश्लेषण करण्यासाठी एआय एजंटस्चा वापर केला. मानवी बुद्धीला सहज न दिसणारे सहसंबंध या एआयने शोधून काढले. तसेच, या चिपमध्ये क्यूबिट्सना बाह्य वातावरणातील विस्कळीतपणा आणि कॉस्मिक किरणांपासून वाचवण्यासाठी अॅल्युमिनियमऐवजी ‘शिशा’ (Lead) या धातूचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे याची स्थिरता कमालीची वाढली. मायक्रोसॉफ्टचे हे दावे जितके मोठे आहेत, तितकीच त्यावर टीकाही होत आहे.