

ह्यूस्टन : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. याचा परिणाम हळूहळू संपूर्ण शरीरावर होतो आणि अनेक लोकांमध्ये पुढे हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. पण, आता टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीचे संशोधक डॉ. के हुआंग यांनी एक खास मायक्रोनिडल पॅच तयार केला आहे, जो हृदयाला स्वतःहून बरे होण्यास मदत करू शकतो. हा पॅच थेट हृदयाच्या जखमी भागावर औषध पोहोचवून ते लवकर बरे होण्यास मदत करतो, विशेष म्हणजे शरीराच्या इतर भागांना कोणतेही नुकसान न पोहोचवता.
या पॅचवर अनेक अतिशय पातळ, उघड्या डोळ्यांनी पाहण्यास कठीण अशा मायक्रोनिडल्स म्हणजेच सुईसारख्या छोट्या-छोट्या सुया लावलेल्या असतात. या सुया हृदयाच्या बाहेरील थराला हलकासा स्पर्श करून आतमध्ये औषध सोडतात. प्रत्येक सुईमध्ये IL-4 नावाचा एक खास रेणू (मॉलेक्यूल) भरलेला असतो, जो शरीरातील रोगप्रतिकार पेशींना योग्य दिशेने काम करण्यासाठी तयार करतो. जसा हा पॅच हृदयावर लावला जातो, तसतसे या सुया हळूहळू विरघळतात आणि औषध थेट त्याच ठिकाणी पोहोचते जिथे त्याची सर्वाधिक गरज असते, म्हणजेच हृदयाच्या जखमी भागावर.
हार्ट अटॅकनंतर हृदयाच्या काही भागांमध्ये रक्तपुरवठा थांबतो, ज्यामुळे स्नायू मरू लागतात. त्यानंतर शरीर त्या नुकसानीवर आवरण घालण्यासाठी स्कार टिश्यू (डागाचे ऊतक) तयार करते. हा स्कार हृदयाला मजबुती देतो खरा, पण तो धडधडण्यास मदत करत नाही. परिणामी, हृदय हळूहळू कमकुवत होत जाते. IL-4 त्या ठिकाणी असलेल्या रोगप्रतिकार पेशींना म्हणजेच मॅक्रोफेजला हा संकेत देतो की त्यांनी ‘सूज आणि लढा’ देण्याच्या मोडमधून बाहेर यावे आणि ‘बरे होण्याच्या मोडमध्ये’ जावे. यामुळे सूज कमी होते, स्कार कमी प्रमाणात तयार होतो, हृदयाच्या पेशी वाचतात आणि हृदय वेगाने बरे होऊ लागते. डॉ. हुआंग यांच्या मते, मॅक्रोफेजच खरे ‘गेम चेंजर’ आहेत. ते एकतर नुकसान वाढवू शकतात किंवा हृदयाला बरे करू शकतात, आणि IL-4 त्यांना योग्य दिशेने घेऊन जातो.