Purest Place Microbes | पृथ्वीवरील सर्वात शुद्ध जागेतही सापडले सूक्ष्मजीव

मंगळ ग्रहावरील मोहिमांना धोका?
Purest Place Microbes
Purest Place Microbes | पृथ्वीवरील सर्वात शुद्ध जागेतही सापडले सूक्ष्मजीव
Published on
Updated on

वॉशिंग्टन : नासाची ‘क्लीनरूम्स’ ही पृथ्वीवरील सर्वात स्वच्छ ठिकाणांपैकी एक मानली जातात. अंतराळयानासोबत पृथ्वीवरील सूक्ष्मजीव इतर ग्रहांवर जाऊ नयेत, यासाठी ही ठिकाणे अत्यंत निर्जंतुक ठेवली जातात. मात्र, शास्त्रज्ञांना एका धक्कादायक संशोधनात असे आढळले आहे की, इतक्या कडक निर्जंतुकीकरण प्रक्रियेनंतरही काही सूक्ष्मजीवांनी तिथे आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधील ज्या क्लीनरूममध्ये 2007 मध्ये ‘फिनिक्स मार्स लँडर’ तयार करण्यात आले होते, तिथे शास्त्रज्ञांना बॅक्टेरियाच्या (जीवाणूंच्या) 24 पेक्षा जास्त नवीन प्रजाती सापडल्या आहेत. विशेष म्हणजे, रसायनांचा मारा आणि अन्नाचा अभाव असूनही या जीवाणूंनी स्वतःमध्ये असे जनुकीय बदल केले आहेत. ज्यामुळे ते अशा कठीण परिस्थितीतही जिवंत राहू शकतात. सौदी अरेबियातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक अलेक्झांडर रोसाडो यांनी सांगितले की, ‘हे संशोधन म्हणजे आम्हाला सर्व गोष्टींची पुन्हा एकदा तपासणी करायला लावणारा क्षण आहे.‘ हे सूक्ष्मजीव जरी संख्येत कमी असले, तरी ते दीर्घकाळ आणि विविध ठिकाणी टिकून राहण्यात यशस्वी झाले आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते, जर हे सूक्ष्मजीव पृथ्वीवरील सर्वात स्वच्छ ठिकाणच्या नियंत्रणातून वाचू शकत असतील, तर ते अंतराळ प्रवासादरम्यान आणि मंगळावर पोहोचल्यावरही जिवंत राहू शकतात. यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नकळतपणे दुसर्‍या ग्रहावर जाऊन तिथल्या पर्यावरणाला दूषित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे जीवाणू मंगळावरील अतिशीत तापमान, घातक रेडिएशन (किरणोत्सर्गी लहरी) आणि अतिनील (णत) किरणांमध्ये तग धरू शकतात का, हे तपासण्यासाठी आता तज्ज्ञ त्यांना एका ‘प्लॅनेटरी सिम्युलेशन चेंबर’ मध्ये (ग्रहावरील वातावरणाची प्रतिकृती असलेल्या कक्षात) ठेवणार आहेत. रोसाडो यांच्या मते, या जीवाणूंमध्ये डीएनए दुरुस्त करण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीत सुप्त अवस्थेत राहण्याची क्षमता असलेले जनुके आहेत. मात्र, अवकाशातील निर्वात पोकळी आणि मंगळावरील टोकाचे वातावरण ते सहन करू शकतील का, हे या चाचणीनंतरच स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news