Columbus discovery controversy | मेक्सिकोतील पुतळ्यामुळे कोलंबसच्या ‘शोधा’वरच प्रश्नचिन्ह!

Columbus discovery controversy|
Columbus discovery controversy | मेक्सिकोतील पुतळ्यामुळे कोलंबसच्या ‘शोधा’वरच प्रश्नचिन्ह!
Published on
Updated on

मेक्सिको सिटी : इतिहासाच्या पुस्तकात आपण सर्वांनी वाचले आहे की, 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. पण, जर हा शोध अर्धसत्य निघाला तर? मेक्सिकोच्या भूमीतून बाहेर आलेल्या एका छोट्याशा अवशेषाने संपूर्ण जगातील इतिहासकार आणि शास्त्रज्ञांची झोप उडवली आहे. ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या एका अहवालानुसार, मेक्सिकोमध्ये एक अशी प्राचीन वस्तू सापडली आहे, जी ओरडून सांगतेय की कोलंबसच्या कित्येक शतकांआधीच युरोप आणि अमेरिका यांच्यात संपर्क झाला होता. ही प्राचीन वस्तू म्हणजे रोमन शैलीतील एक मूर्ती किंवा पुतळा आहे.

या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे ‘टेकाक्सिक-कैलिक्स्टलाहुआका हेड’. हे टेराकोटापासून बनवलेले एका दाढीवाल्या माणसाच्या मूर्तीचे डोके आहे, जे हुबेहूब प्राचीन रोमन शैलीतील दिसते. 1933 मध्ये मेक्सिकन पुरातत्त्वशास्त्रज्ञ जोस गार्सिया पायन यांनी मेक्सिको सिटीजवळील एका पिरॅमिडसद़ृश वास्तूच्या उत्खननादरम्यान याचा शोध लावला होता. सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, ही मूर्ती जमिनीच्या तीन सुरक्षित थरांच्या खाली एका सीलबंद थडग्यात सापडली होती. त्यासोबत सोन्याचे दागिने आणि हाडांच्या वस्तूही आढळल्या होत्या.

या मूर्तीची ओळख पटवण्यासाठी दशकानुदशके संशोधन चालले: रोमन कनेक्शन : 1990 मध्ये जर्मन पुरातत्त्वशास्त्रज्ञ बर्नार्ड अँड्रिया यांनी पुष्टी केली की, ही मूर्ती निश्चितपणे रोमन मूळची आहे. तिची केशरचना आणि दाढीची धाटणी रोमन साम्राज्यातील ‘सेवरन’ काळातील शासकांशी जुळते.काळाचा उलगडा : ‘थर्मोल्युमिनेसन्स डेटिंग’ तंत्राचा वापर केल्यावर असे आढळले की, ही वस्तू इसवी सन पूर्व 9 व्या शतकापासून इसवी सन 13 व्या शतकापर्यंतच्या काळातील आहे. म्हणजेच कोलंबस अमेरिकेत पोहोचण्याच्या कित्येक शतकांआधीची!

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, एक रोमन मूर्ती मेक्सिकोतील सीलबंद थडग्यापर्यंत कशी पोहोचली? हे थडगे इसवी सन 1476 ते 1510 च्या दरम्यानचे असल्याचे सांगितले जाते, जे स्पॅनिश विजेता हर्नान कोर्टेस याच्या आगमनापूर्वीचे (1519) आहे. संभाव्य सिद्धांत : काही संशोधकांच्या मते, एखादे रोमन किंवा फोनिशियन जहाज समुद्री प्रवाहामुळे चुकून अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेपर्यंत पोहोचले असावे आणि तेथील लोकांनी ही मूर्ती देशाच्या अंतर्गत भागात नेली असावी. मात्र, अमेरिकेत अद्याप कोणत्याही रोमन वस्तीचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. दीर्घकाळ असे मानले जात होते की कोलंबसच्या आधी कोणताही युरोपियन अमेरिकेत पोहोचला नाही; परंतु आता ही धारणा बदलत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news