Space Science | दोन वर्षांपूर्वी घरात पडलेल्या उल्केत सापडले जीवसृष्टीचे मूळ घटक

शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा
Space Science |
Space Science | दोन वर्षांपूर्वी घरात पडलेल्या उल्केत सापडले जीवसृष्टीचे मूळ घटक
Published on
Updated on

वॉशिंग्टन : दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका घराचे छत फाडून आत पडलेल्या उल्केच्या तुकड्यांमध्ये शास्त्रज्ञांना जीवसृष्टीचे मूलभूत घटक सापडले आहेत. एका नवीन संशोधनातून समोर आले आहे की, या अंतराळातून आलेल्या खडकात अमिनो ॲसिड, सेंद्रिय कार्बन संयुगे आणि इतर ‘प्रिबायोटिक’ रेणू आहेत. हे घटक अगदी तसेच आहेत, ज्यांनी अब्जावधी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात करण्यास मदत केली असावी.

‘नासा’चे एम्स रिसर्च सेंटर आणि ‘सेटी’ इन्स्टिट्यूटचे उल्का खगोलशास्त्रज्ञ पीटर जेनिस्केन्स यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने न्यू जर्सीच्या हिल्सबोरो येथील घरमालकाचे कौतुक केले आहे. १६ जुलै २०२४ रोजी ही उल्का घराचे छत तोडून आत पडली होती. घरमालकाने अत्यंत कठीण परिस्थितीतही कोणतीही घाईगडबड न करता, ती उल्का सुरक्षित ठेवली. त्याने डिस्पोजेबल हातमोजे आणि ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करून उल्केचे तुकडे काचेच्या बरण्यांमध्ये गोळा केले, ज्यामुळे या तुकड्यांवर बाहेरील प्रदूषण झाले नाही. या घटनेची आठवण सांगताना नाव न जाहीर केलेल्या घरमालकाने सांगितले, ‘मी त्या वेळी घरातच होतो. अचानक एक मोठा आवाज झाला आणि मुख्य बेडरूमच्या छताला मोठे छिद्र पडल्याचे मला दिसले. तिथे सल्फरसारखा (गंधक) तीव्र वास येत होता.

माझ्या बेडवर, कार्पेटवर आणि आजुबाजूला काळे तुकडे, कचरा आणि काळी धूळ पसरली होती.’ शास्त्रज्ञांच्या मते, हे उल्केचे तुकडे अत्यंत मौल्यवान आहेत. हे तुकडे आपल्या प्राचीन सूर्यमालेतील एका अशा ग्रहाचे असावेत, जो पूर्णपणे तयार होऊ शकला नव्हता. पीटर जेनिस्केन्स यांनी सांगितले की, ’या तुकड्यांच्या फॉरेन्सिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, एका प्राचीन लघुग्रहाच्या पृष्ठभागाजवळचे काही भाग यात सुरक्षित राहिले होते. या भागाला अति-क्षारीय द्रवाचा सामना करावा लागला होता. या प्रकारच्या प्रोटोप्लॅनेटच्या जगात अशी प्रक्रिया यापूर्वी कधीही आढळून आली नव्हती.’ १५ जुलै रोजी ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नामांकित नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनात ही उल्का घरापर्यंत कशी पोहोचली, याचा मार्गही शोधण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news