

मॅकडोनो : या उन्हाळ्यात जॉर्जियातील एका नागरिकाच्या घरात थेट छप्पर तोडून घुसलेला अंतराळातील दगड आपल्या पृथ्वी ग्रहापेक्षा तब्बल 20 दशलक्ष वर्षांनी जुना असू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. या घटनेमुळे केवळ एका घराचे नुकसान झाले नाही, तर अब्जावधी वर्षांपूर्वीच्या सौरमालेच्या इतिहासाचे एक रहस्यच उलगडले आहे.
26 जून रोजी ही उल्का आकाशात एका तेजस्वी अग्नीगोळ्याप्रमाणे वेगाने प्रवास करत आली आणि तिचा एक तुकडा मॅकडोनो शहरातील एका घरावर आदळला. जॉर्जिया विद्यापीठातील एका संशोधकाने घरातून मिळालेल्या या उल्केच्या तुकड्याचा अभ्यास केला. या अभ्यासात असे आढळून आले की, ही उल्का सुमारे 4.56 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली होती, म्हणजेच ती पृथ्वीच्या निर्मितीपेक्षा सुमारे 20 दशलक्ष वर्षे जुनी आहे.
जॉर्जिया विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील संशोधक स्कॉट हॅरिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘वातावरणात प्रवेश केलेल्या या विशिष्ट उल्केचा मॅकडोनोच्या जमिनीवर पोहोचण्यापूर्वी एक मोठा इतिहास आहे.’ हॅरिस यांच्या विश्लेषणानुसार, ही नव्याने ‘मॅकडोनो उल्का’ म्हणून ओळखली जाणारी उल्का मंगळ ग्रहाच्या पलीकडून आली आहे आणि तिचा संबंध सुमारे अर्धा अब्ज वर्षांपूर्वी तुटलेल्या एका मोठ्या लघुग्रहाशी आहे.
‘ही उल्का मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान असलेल्या मुख्य लघुग्रह पट्ट्यातील एका गटाशी संबंधित आहे. आमचा असा विश्वास आहे की, सुमारे 470 दशलक्ष वर्षांपूर्वी एका मोठ्या लघुग्रहाच्या विघटनातून हे तुकडे तयार झाले,’ असे हॅरिस यांनी स्पष्ट केले. ‘या विघटनानंतर, काही तुकडे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार्या मार्गावर आले आणि योग्य वेळ जुळून आल्यास, त्यांची सूर्याभोवतीची भ्रमणकक्षा आणि पृथ्वीची भ्रमणकक्षा एकाच वेळी एकाच ठिकाणी येतात.’