AI Smart Glasses | मेटा करत आहे ‘सुपर सेन्सिंग’ एआय चष्म्याची चाचणी

सर्व पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्या गॅजेटमुळे ‘प्रायव्हसी’ची चिंता वाढली!
AI Smart Glasses |
AI Smart Glasses | मेटा करत आहे ‘सुपर सेन्सिंग’ एआय चष्म्याची चाचणी
Published on
Updated on

न्यूयाॅर्क : फेसबुकची पॅरेंट कंपनी ‘मेटा’ सध्या एका अत्यंत प्रगत अशा स्मार्ट एआय चष्म्याची चाचणी करत आहे. मात्र, हा चष्मा बाजारात येण्यापूर्वीच याच्यामुळे लोकांच्या खासगीपणाच्या (Privacy) सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. दावा केला जात आहे की, मेटाचा हा 'सुपर सेन्सिंग एआय स्मार्ट ग्लास' चष्मा घालणाऱ्या व्यक्तीच्या दिवसभरातील सर्व ऑडिओ (संभाषण) सलग रेकॉर्ड करण्यासाठी आणि दर काही सेकंदाला फोटो क्लिक करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे.

‘द फायनान्शियल टाइम्स’च्या एका रिपोर्टनुसार, मेटाचा उद्देश या नवीन हार्डवेअरच्या मदतीने चष्म्याला अशा डिजिटल सपोर्टरमध्ये बदलणे आहे, जो सर्व काही पाहू आणि ऐकू शकेल. या सतत रेकॉर्ड होणाऱ्या डेटाच्या मदतीने युझर मेटा एआयचा वापर करून आपल्या दिवसभरातील आठवणी पुन्हा ताज्या करू शकेल, आधी पाहिलेल्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारू शकेल किंवा जुने संभाषण आठवू शकेल. मात्र, यावरून प्रायव्हसी तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. मेटाचे हे पाऊल डेटा प्रायव्हसी आणि बायोमेट्रिक ट्रॅकिंग कायद्यांचे उल्लंघन करू शकते. या प्रोटोटाइपमुळे (प्रायोगिक मॉडेल) खुद्द मेटा कंपनीच्या आतच प्रायव्हसीच्या आव्हानांवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे, विशेषतः अशा सामान्य लोकांबाबत ज्यांना हे माहीतच नसेल की त्यांचे रेकॉर्डिंग केले जात आहे.

मेटाच्या सध्या बाजारात असलेल्या कमर्शियल स्मार्ट चष्म्यामध्ये जेव्हा जेव्हा युझर फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करतो, तेव्हा चष्म्याच्या फ्रेमच्या कोपऱ्यात एक चमकणारी ‘एलईडी लाईट’ ऑटोमॅटिकली सुरू होते, ज्यामुळे आसपासचे लोक सावध होतात. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन 'सुपर सेन्सिंग कंटीन्यूअस रेकॉर्डिंग' फीचरदरम्यान ही एलईडी लाईट न पेटवण्याची योजना मेटाचे अधिकारी आखत आहेत. हा निर्णय बदलला जाऊ शकतो; पण जर असे झाले नाही, तर समोरच्या व्यक्तीला चष्मा घालणारा आपली गुपचूप रेकॉर्डिंग करत आहे हे ओळखणे अशक्य होईल. तसेच, कंपनी एका साध्या सॉफ्टवेअर अपडेटद्वारे बाजारात आधीपासून असलेल्या चष्म्यांमध्येही हे सुपर-सेन्सिंग फीचर देऊ शकते, असेही इनसाइडर्सचे म्हणणे आहे. हा निर्णय मेटाचे सीईओ मार्क जुकेरबर्ग यांच्या त्या योजनेचा भाग आहे, ज्यानुसार भविष्यात एआय-पावर्ड स्मार्ट ग्लास हे स्मार्टफोनची जागा घेतील. जुकेरबर्ग यांनी नुकतेच एका अर्निंग कॉल दरम्यान या प्रोजेक्टचे संकेत दिले होते. हा चष्मा युझरचा ‘पर्सनल एजंट’ म्हणून काम करावा आणि गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत करावी, अशी त्यांची इच्छा आहे.

मेटा इंजिनिअर्सची ‘शक्कल’

प्रायव्हसी रेग्युलेटर्स आणि कायदेशीर अडचणींपासून वाचण्यासाठी मेटाच्या इंजिनिअर्सनी एक अनोखी तांत्रिक तोडगा शोधला आहे: या सिस्टीमअंतर्गत, मूळ रॉ व्हिडीओ फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग मेटा कधीही स्टोअर (साठवून) करणार नाही आणि ते युझरलाही उपलब्ध होणार नाही. याऐवजी, चष्मा त्वरित त्या इमेज आणि ऑडिओमधून 'मेटाडेटा' म्हणजेच फक्त मुख्य माहितीचे 'टेक्स्ट डिस्क्रिप्शन' (लिखाण) तयार करेल. हे केवळ टेक्स्ट स्वरूपातील डेटा मेटाच्या सर्व्हरवर अपलोड केले जाईल. यामुळे कायदेशीर आणि प्रायव्हसीशी संबंधित अडचणी कमी होतील, असा कंपनीचा विश्वास आहे. दरम्यान, मेटा कंपनीने या अंतर्गत प्रोटोटाइपवर अधिकृतपणे कोणतीही थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news