

वॉशिंग्टनः आपल्या सौरमालेतील सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह बुध याच्या असामान्य रचनेमागे दोन समान आकाराच्या प्रोटोप्लॅनेट्समधील ‘हिट अँड रन’ स्वरूपाच्या धडकेचे कारण असू शकते, असे एका नव्या अभ्यासातून सुचवले गेले आहे. बुधाइतक्याच आकाराच्या एखाद्या ग्रहाने त्याच्या जवळून वेगाने पुढे जात असताना त्याला टक्कर दिली असावी.
बुध ग्रहाची अनेक वैशिष्ट्ये शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून गोंधळात टाकणारी आहेत. पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडासा मोठा असूनही, बुध खूपच वजनदार आहे. त्याच्या एकूण वस्तुमानाच्या जवळपास 60 टक्के भाग लोह-समृद्ध कोअरने बनलेला आहे, जे पृथ्वी, शुक्र किंवा मंगळासारख्या इतर खडकाळ ग्रहांच्या तुलनेत दुप्पट आहे. ही बाब पारंपरिक ग्रहनिर्मितीच्या सिद्धांतांना आव्हान देणारी आहे. ‘नासा’च्या ‘मेसेंजर’ मोहिमेच्या 2011 ते 2015 दरम्यान मिळालेल्या माहितीवरून असेही समोर आले की, बुधाच्या पृष्ठभागावर पोटॅशियम, सल्फर आणि सोडियमसारख्या अस्थिर मूलद्रव्यांची आश्चर्यकारक प्रमाणात उपस्थिती आहे.
जर बुधावर सुरुवातीच्या काळात एखादा मोठा आणि दुर्मीळ धक्का बसला असता, तर हे मूलद्रव्य नष्ट झाले असते, असे आधीच्या सिद्धांतांमध्ये मानले जात होते. त्यामुळे बुधाच्या बाह्य थराचा मोठा भाग नष्ट होऊनही हे मूलद्रव्य कसे टिकून राहिले, याचे उत्तर शोधणे गरजेचे झाले. या नव्या अभ्यासात करण्यात आलेल्या संगणकीय मॉडेलिंगवरून हे सुचवले जात आहे की, बुधाची ही विचित्र रचना एखाद्या समान आकाराच्या प्रोटोप्लॅनेटबरोबर झालेल्या एका निसटत्या धडकेमुळे झाली असावी. या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि पॅरिस इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनेटरी फिजिक्स येथील पोस्टडॉक्टरल संशोधक पॅट्रिक फ्रँको यांनी सांगितले, “अशा प्रकारचा धक्का ‘नशीबवान’ वाटला तरी तो त्या काळात असामान्य नव्हता आणि कदाचित अशाच धडकेमुळे बुध तयार झाला असावा.”