

वॉशिंग्टन : उत्तर युरोपमधील हवामानाचे नियमन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अटलांटिक महासागरातील प्रवाहांची साखळी वाचवण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक धाडसी आणि अवाढव्य कल्पना मांडली आहे. रशिया आणि अलास्का यांना जोडणार्या ‘बेरिंग सामुद्रधुनी’वर एक महाकाय धरण बांधल्यास हवामानातील संभाव्य मोठा धोका टाळता येऊ शकतो, असे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे. रशिया आणि अलास्कादरम्यान धरण बांधून पॅसिफिक महासागराला आर्क्टिक महासागरापासून वेगळे करणे, हा या ‘जिओइंजिनिअरिंग’ योजनेचा मुख्य उद्देश आहे.
‘अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्कुलेशन’ (AMOC) म्हणून ओळखली जाणारी प्रवाहांची यंत्रणा सध्या धोक्यात आहे. हे धरण बांधल्यास या यंत्रणेला कोलमडण्यापासून वाचवण्यासाठी अधिक वेळ मिळू शकेल. AMOC ही उष्णकटिबंधातील ऊबदार आणि क्षारयुक्त पाणी उत्तरेकडे वाहून नेणारी एक नैसर्गिक प्रणाली आहे. तिथे हे पाणी थंड होऊन खाली बसते आणि पुन्हा दक्षिणेकडे वाहू लागते. यामुळेच उच्च अक्षांशावर असूनही युरोपमध्ये हवामान तुलनेने सौम्य राहते.
तापमानात घट : उत्तर युरोपमधील तापमानात मोठी घट होईल. दुष्काळ : अनेक देशांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागेल.
समुद्र पातळीत वाढ : उत्तर अमेरिकेच्या ईशान्य किनारपट्टीवर समुद्राची पातळी किमान 1.6 फुटाने (50 सें.मी.) वाढू शकते.
अन्नटंचाई : जागतिक अन्न उत्पादनावर याचे गंभीर परिणाम होतील. नेदरलँडमधील उट्रेच विद्यापीठातील संशोधक जेले सून यांच्या मते, सुमारे 30 दशलक्ष वर्षांपूर्वी मध्य-प्लीओसीन काळात ही प्रवाह प्रणाली अधिक मजबूत होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे तेव्हा बेरिंग सामुद्रधुनी जमिनीच्या पुलामुळे बंद होती. ‘जर आपण पुन्हा बेरिंग सामुद्रधुनी बंद केली, तर काय होईल याचा विचार या संशोधनामागे आहे, असे सून यांनी सांगितले. ही योजना जितकी प्रभावी वाटते, तितकीच ती आव्हानात्मक आणि जोखमीचीदेखील आहे. संशोधकांनी सावध केले आहे की, याचे परिणाम अत्यंत अस्थिर असू शकतात. हा अभ्यास प्राथमिक स्वरूपाचा असून, अशा धाडसी पावलाची खरोखर गरज आहे का, हे पाहण्यासाठी अधिक प्रगत मॉडेलिंग अभ्यासांची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यावरणात मानवी हस्तक्षेप केल्यामुळे इतर अनपेक्षित धोके निर्माण होऊ शकतात. वाढत्या जागतिक तापमानामुळे उत्तर अटलांटिकमधील बर्फ वितळून गोड पाणी समुद्रात मिसळत आहे, ज्यामुळे प्रवाहांची ही नैसर्गिक साखळी कमकुवत होत आहे. 2100 सालापर्यंत ही प्रणाली 43 टक्के ते 59 टक्क्यांनी मंदावू शकते. त्यामुळे, असे महाकाय प्रकल्प भविष्यात मानवजातीला वाचवण्यासाठी अनिवार्य ठरू शकतात; परंतु सध्या तरी हा केवळ एक सैद्धांतिक प्रस्ताव आहे.