

मॉस्को : रशियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी मध्ययुगीन काळातील तब्बल २,६०० चांदीच्या नाण्यांचा मोठा साठा शोधून काढला आहे. यात आधी कधीही न दिसलेल्या ३५० पेक्षा जास्त दुर्मीळ नाण्यांचा समावेश आहे. हा अमूल्य खजिना एखाद्या श्रीमंत सरदाराचा किंवा व्यापाऱ्याचा असावा आणि नंतर प्लेगच्या साथीचा बळी पडल्यामुळे हा साठा जमिनीतच राहून गेला असावा, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी ऑफ द रशियन अकादमी ऑफ सायन्सेस’ने २६ ऑगस्ट रोजी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व नाणी एका सुंदर कलाकुसर केलेल्या मातीच्या मडक्यात आढळली आहेत. मॉस्को शहराच्या आग्नेयेस सुमारे ११४ किलोमीटर (७१ मैल) अंतरावर असलेल्या ‘कोलोम्ना’ या ऐतिहासिक शहराच्या मध्यवर्ती भागातील एका खड्ड्यात हे मडके पुरलेले होते. १४ व्या आणि १५ व्या शतकात कोलोम्ना हे या प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महत्त्वाचे शहर मानले जात होते. सापडलेल्या चांदीच्या नाण्यांपैकी बहुतांश नाणी ‘देंगा’ या प्रकारातील आहेत.
‘ग्रँड प्रिन्सिपॅलिटी ऑफ मॉस्को’ (मध्ययुगीन रशियन राजेशाही) द्वारे १४ व्या शतकाच्या शेवटी ही नाणी पाडली जाऊ लागली होती. एक ‘देंगा’ म्हणजे अर्धा कोपेक असे त्याचे मूल्य होते, तर १०० कोपेकचा एक रुबल होत असे. या खजिन्यात वासिली प्रथम (कारकीर्द १३८९ ते १४२५) आणि वासिली द्वितीय (कारकीर्द १४२५ ते १४६२) यांच्या काळात कोलोम्ना येथे तयार करण्यात आलेल्या नाण्यांचे प्राबल्य आहे. हे दोघेही मॉस्कोचे ग्रँड प्रिन्स (राजे) होते. या साठ्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण नाणे म्हणजे वासिली प्रथम यांच्या अंतिम काळात पाडलेले एक अत्यंत दुर्मीळ ‘देंगा’ नाणे आहे, ज्यावर ‘उडणारा पक्षी’ चित्रित केलेला आहे. याशिवाय, सुमारे ३५० पेक्षा जास्त नाणी ही पूर्वी कधीही न पाहिलेल्या प्रकारची असून, तज्ज्ञ सध्या त्यांचा सखोल अभ्यास करत आहेत.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, कोलोम्नामधील हा खजिना जमिनीत पुरणारी व्यक्ती ही खूप श्रीमंत, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी किंवा अत्यंत यशस्वी व्यापारी असावी. हा खजिना का पुरला गेला याचे कारण स्पष्ट नसले, तरी नाण्यांचा काळ यामागचा महत्त्वाचा सुगावा देतो. या साठ्यातील सर्वात शेवटी पाडलेली नाणी ही १४२० च्या दशकाच्या उत्तरार्धातील आहेत. त्यामुळे १४२४ ते १४२७ या काळात रशियन राज्यांमध्ये पसरलेल्या प्लेगच्या महाभयंकर साथीचा हा खजिना मालक बळी पडला असावा आणि त्यामुळेच हा साठा जमिनीतच पडून राहिला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे.