

केंब्रिज : केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. वैज्ञानिकांनी अवघ्या १० डॉलर (अंदाजे ८५० रुपये) किमतीचा एक अत्यंत सूक्ष्म ‘ऑप्टिकल सेन्सर’ यार केला आहे. हा सेन्सर प्रयोगशाळेतील मोठ्या उपकरणांइतकीच अचूकता देतो आणि तो हातातील स्मार्टवॉच किंवा कोणत्याही वेअरेबल गॅझेटमध्ये सहज बसू शकतो.
सुई न टोचता होणार रक्तातील साखरेची तपासणी
या शोधाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे मधुमेहाच्या (डायबेटिस) रुग्णांना वारंवार सुई टोचून रक्तातील साखर मोजावी लागणार नाही. हा सेन्सर त्वचेवर प्रकाशाच्या विश्लेषणाद्वारे शरीरातील ग्लुकोज, रक्तातील अल्कोहोल, लॅक्टेट आणि डिहायड्रेशनची पातळी अचूकपणे मोजू शकतो. प्रयोगशाळेत घेतलेल्या चाचण्यांमध्ये या चिप तंत्रज्ञानाने प्लास्टिक, औषधे, अन्नपदार्थ, चहा आणि कॉफीचे घटक १०० टक्के अचूकतेने ओळखून दाखवले.
हे तंत्रज्ञान कसे काम करते?
पारंपरिक स्पेक्ट्रोमीटर हे आकाराने खूप मोठे आणि महाग असतात. केंब्रिजच्या संशोधकांनी ‘कन्व्होल्यूशन थ्योरम’ या गणितीय तत्त्वाचा थेट प्रकाशावर वापर करून नवीन ‘कन्व्होल्युशनल स्पेक्ट्रोमीटर’ तयार केला. कमी कॉम्प्युटेशनल पॉवर हे या नवीन तंत्रज्ञानाचे खास वैशिष्ट आहे. या नवीन रचनेमुळे डेटा प्रक्रियेसाठी खूप कमी ऊर्जा लागते आणि १ सेकंदापेक्षा कमी वेळेत अचूक निकाल मिळतो. कठीण तापमानातही हे नवीन तंत्रज्ञान कार्यक्षम राहते. हा सेन्सर -२० अंश सेल्सिअसते ८० अंश सेल्सिअस या अत्यंत कठीण तापमानातही विनाअडथळा काम करू शकतो.
स्पेक्ट्रोमेट्री तंत्रज्ञान दैनंदिन वापरातील गॅझेट बनणार
आमचे ध्येय स्पेक्ट्रोमेट्री तंत्रज्ञान प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील गॅझेटचा भाग बनवणे हे आहे. यामुळे अन्नसुरक्षा, औद्योगिक उत्पादन आणि आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल, असे या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक किसीयांग चेन्ग यांनी सांगितले. भविष्यात हे चिप तंत्रज्ञान स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडमध्ये समाविष्ट केले गेल्यास प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्यावर सतत आणि सहजपणे लक्ष ठेवता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.