McMurdo Dry Valley | पृथ्वीवरील ‘मंगळा’वर गेल्या 20 हजार वर्षांपासून जीवसृष्टीच नाही!

McMurdo Dry Valley | पृथ्वीवरील ‘मंगळा’वर गेल्या 20 हजार वर्षांपासून जीवसृष्टीच नाही!
Published on
Updated on

लंडन : अंटार्क्टिकाच्या टोकावर असलेला मॅकमर्डो ड्राय व्हॅली हा प्रदेश म्हणजे पृथ्वीवरील सर्वात कठोर आणि निर्जन वाळवंट आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा भाग इतका प्रतिकूल आहे की, तिथे गेल्या 20 ते 30 हजार वर्षांपासून जीवसृष्टीचे कोणतेही साधे चिन्हसुद्धा उरलेले नाही.

अंटार्क्टिकातील व्हिक्टोरिया लँड भागात, मॅकमर्डो स्टेशनपासून सुमारे 97 कि.मी. अंतरावर या मॅकमर्डो ड्राय व्हॅली आहेत. त्यांचा विस्तार सुमारे 4,800 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. अंटार्क्टिकाचा 98 टक्के भाग बर्फाखाली असला, तरी मॅकमर्डो ड्राय व्हॅलीचा भाग मात्र बर्फमुक्त आहेत.

शास्त्रज्ञांना मॅकमर्डो ड्राय व्हॅली हा प्रदेश मंगळ ग्रहासारखा का वाटतो? याची कारणेही आहेत. मॅकमर्डो ड्राय व्हॅली अंटार्क्टिकामध्ये असूनही या खोर्‍यात बर्फ नाही. सभोवतालचे पर्वत बर्फाला आत येण्यापासून रोखतात. त्यामुळे हा भाग कोरडा राहतो. यामुळे ‘बर्फमुक्त वाळवंट’ असेही या व्हॅलीला म्हणतात. या व्हॅलीत ताशी 320 कि.मी. वेगाने थंड आणि कोरडे वारे वाहतात, त्यांना ‘काटाबॅटिक वारे’ म्हणतात. हे वारे हवेतील उरली-सुरली आर्द्रताही शोषून घेतात. त्यामुळे या व्हॅलीचा प्रदेश पृथ्वीवरील सर्वात शुष्क भाग बनला आहे. या ठिकाणचे तापमान इतके कमी असते की, कोणत्याही सजीवाचे जगणे अशक्यप्राय आहे.

अमेरिकेच्या ‘नासा’ने मॅकमर्डो ड्राय व्हॅलीतील वातावरणाचा अभ्यास सुरू केला आहे. या ठिकाणचे वातावरण मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे मंगळावर जीवसृष्टी शोधण्यासाठी लागणार्‍या उपकरणांची चाचणी घेण्यासाठी ‘नासा’ या ठिकाणाचा वापर करते. ‘बीबीसी वाईल्ड लाईफ मॅगझिन’च्या अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी ठामपणे सांगितले आहे की, ‘तिथे (मॅकमर्डो ड्राय व्हॅलीत) जीवन नाही, हेच अंतिम सत्य आहे.’ किमान गेल्या 20-30 हजार वर्षांत तिथे जीवसृष्टीची कोणतीही हालचाल झालेली नाही. जरी या ठिकाणी जीवन नसले, तरी भूगर्भशास्त्र आणि हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण शास्त्रज्ञांसाठी एक महत्त्वाची प्रयोगशाळा ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news