

नागपूर : माणूस एखाद्या जागेतून किंवा नात्यातून बाहेर पडतो, पण त्या जागेचा स्पर्श आणि आठवणी मनात कायम घर करून राहतात. अशीच एक विलक्षण आणि भावूक करणारी घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. 41 वर्षांपूर्वी नागपूरच्या रस्त्यावर सोडलेला तीन दिवसांचा चिमुरडा आज नेदरलँडमधील एका शहराचा महापौर बनला असून, तो आपल्या जन्मदात्या आईचा शोध घेण्यासाठी पुन्हा मायदेशी परतला आहे.
10 फेब—ुवारी 1985 रोजी नागपूरच्या अंबाझरी रोडवरील ‘मातृ सेवा संघ’ या संस्थेत एका 21 वर्षीय अविवाहित मातेने आपल्या तीन दिवसांच्या बाळाला सोडले होते. परिस्थितीमुळे ओढवलेल्या त्या विवंचनेत त्या मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला तिथे सोडून दिले. संस्थेतील एका नर्सने त्या बाळाचा जन्म ‘फाल्गुन’ महिन्यात झाला होता म्हणून त्याचे नाव ‘फाल्गुन’ ठेवले. काही आठवड्यांनंतर, कायदेशीर प्रक्रियेद्वारे एका डच (नेदरलँडच्या) दाम्पत्याने या बाळाला दत्तक घेतले आणि ते त्याला आपल्यासोबत नेदरलँडमध्ये घेऊन गेले.
फाल्गुन नेदरलँडमध्ये एका चांगल्या कुटुंबात लहानाचे मोठे झाले. त्यांना भारताविषयी फक्त भूगोलच्या पुस्तकातील नकाशात दिसणारा एक बिंदू एवढीच माहिती होती. मात्र, मोठे झाल्यावर त्यांना आपल्या मुळाबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी समाजसेवा, राजकारणात रस घेतला आणि आज ते अॅमस्टरडॅमपासून 30 किमी अंतरावर असलेल्या ‘हेमस्टेड’ या शहराचे महापौर म्हणून कार्यरत आहेत. महापौर फाल्गुन सांगतात की, त्यांनी महाभारत वाचले आहे. त्यातील कर्ण आणि कुंतीचे नाते त्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेले. ‘प्रत्येक कर्णाला आपल्या कुंतीला भेटण्याचा हक्क आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे, असे भावूक उद्गार त्यांनी काढले.
2006 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी ते पहिल्यांदा पर्यटक म्हणून भारतात आले. तेव्हा त्यांना इथल्या लोकांमध्ये एक विलक्षण आपलेपणा जाणवला. 2017 मध्ये आईचा शोध घेण्याच्या उद्देशाने ते पहिल्यांदा नागपूरच्या ‘मातृ सेवा संघा’त आले. तिथे त्यांना काही कागदपत्रे मिळाली, पण पत्ता नसल्यामुळे शोध अपूर्ण राहिला. 2024 (ऑगस्ट) मध्ये लग्नानंतर आणि चार मुलांचे वडील झाल्यानंतर, पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी पुन्हा शोध सुरू केला. नागपूरचे महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी आणि जिल्हाधिकारी विपीन इटाणकर यांच्या मदतीने जुने रेकॉर्ड तपासण्यात आले.
2025 (डिसेंबर) मध्ये त्यांनी केलेल्या दौर्यात जिल्हा प्रशासनातील अधिकारी विनोद जाधव यांच्या पथकाने एका निवृत्त नर्सचा शोध लावला, ज्यांनी 41 वर्षांपूर्वी त्यांचे नाव ‘फाल्गुन’ ठेवले होते. त्या नर्सला तो काळ आणि बाळाला भरती करण्याची परिस्थिती आजही आठवत होती. ‘ज्या स्त्रीने मला माझे नाव दिले, तिला भेटणे हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण होता, असे सांगताना फाल्गुन यांच्या डोळ्यांत पाणी आले. आपल्या आईबद्दल बोलताना फाल्गुन म्हणतात, ‘कदाचित ती आजही अपराधीपणाच्या भावनेत जगत असेल, की तिने अक्षम्य चूक केली आहे. पण मला तिला फक्त एकदा भेटून सांगायचे आहे की, ‘आई, मी ठीक आहे, माझे आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुझ्या मुलावर खूप प्रेम करणार्या लोकांनी त्याला मोठे केले आहे.’ फाल्गुन यांचा हा शोध अजूनही संपलेला नाही. आपल्या आईला भेटण्याच्या आशेने ते पुढच्या वर्षी पुन्हा नागपूरला येणार आहेत.