

लिमा : एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेल्या माया संस्कृतीबद्दल एका नवीन संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. सुमारे 1,400 वर्षांपूर्वी या संस्कृतीची लोकसंख्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त होती, इतकेच नव्हे, तर त्यांची वस्ती अधिक गुंतागुंतीची आणि एकमेकांशी जोडलेली होती, असे या अभ्यासात म्हटले आहे.
2018 साली केलेल्या एका अभ्यासात, इ.स. 600 ते 900 या ‘उत्तर अभिजात काळात’ (Late Classic Period) माया लोकांची संख्या सुमारे 1.1 कोटी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, ‘जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्स : रिपोर्टस्’मध्ये 7 जुलै रोजी ऑनलाईन प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनात, 2018 च्या अभ्यासातील काही लेखकांनीच हा अंदाज सुधारून तो 1.6 कोटीपर्यंत नेला आहे. दोन्ही अभ्यासांमध्ये माया लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठी लिडार (Lidar-Light Detection and Ranging) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
या तंत्रज्ञानामध्ये, विमानातून जमिनीवर लेझर किरणांचा मारा केला जातो, ज्यामुळे त्या भागाचा त्रिमितीय (3 D) नकाशा तयार होतो. या नकाशांवर दिसणार्या इमारतींच्या अवशेषांवरून लोकसंख्येच्या घनतेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळते. या माहितीच्या आधारे संशोधक एकूण लोकसंख्येचा अंदाज लावू शकतात. ‘आमच्या 2018 च्या लिडार विश्लेषणातून लोकसंख्येच्या अंदाजात थोडी वाढ अपेक्षित होती; पण थेट 45% वाढ पाहणे खरोखरच आश्चर्यकारक होते,’ असे या नवीन अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि अमेरिकेतील तुलाने विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक फ्रान्सिस्को एस्ट्राडा-बेली यांनी एका निवेदनात म्हटले.
‘या नवीन माहितीमुळे माया संस्कृतीच्या सखल प्रदेशात किती घनदाट लोकवस्ती होती आणि समाज किती संघटित होता, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.’ माया संस्कृतीचा सखल प्रदेश हा ग्वाटेमाला, बेलिझ आणि मेक्सिकोच्या काही भागांचा समावेश असलेला एक विस्तीर्ण जंगली भूभाग आहे. संशोधकांनी ग्वाटेमालातील पेटेन विभाग, पश्चिम बेलिझ आणि मेक्सिकोमधील कॅम्पेशे व क्विंटाना रू या राज्यांमधील सुमारे 95,000 चौरस किलोमीटर क्षेत्राचे लिडार नकाशे तयार केले. इ.स. 250 ते 900 या काळात माया संस्कृती आपल्या परमोच्च शिखरावर होती आणि मेसोअमेरिकेत अनेक मोठी शहरे भरभराटीला आली होती.
आतापर्यंत संशोधकांचा असा समज होता की, काही प्रमुख शहरांव्यतिरिक्त माया संस्कृती ही विखुरलेल्या वस्त्यांपुरती मर्यादित होती आणि त्यांच्यामध्ये विस्तीर्ण उष्णकटिबंधीय जंगलात शेतजमीन पसरलेली होती. मात्र, या नवीन संशोधनाने हा द़ृष्टिकोन बदलला आहे. आता असे दिसून येते की, माया समाज हा केवळ मोठ्या शहरांपुरताच मर्यादित नव्हता, तर त्यांच्या सखल प्रदेशातही एक अत्यंत विकसित, घनदाट आणि संघटित समाज अस्तित्वात होता, ज्याने इतिहासाच्या अनेक कल्पनांना आव्हान दिले आहे.