

वॉशिंग्टन : परमेश्वराबाबत प्रत्येकाचे स्वतःचे विचार असतात. कोणी त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही, तर कोणी वेगवेगळ्या धर्मांप्रमाणे त्याची पूजा करतो. आपल्या देशात वेदान्तानुसार प्रत्येकाचा शुद्ध ‘मी’ (मन किंवा शारीरिक व्यक्तित्व नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाची शुद्ध व नित्य जाणीव) हेच परमतत्व आहे. प्रत्येकाच्या अंतर्यामी असणारे ‘मी आहे’ असे सुस्पष्ट स्फुरण म्हणजेच आत्मा आहे व तोच परमात्माही आहे. (अर्थातच ‘मी नाही’ असे कुणीही म्हणू शकत नाही!) वैज्ञानिकांसाठीही परमेश्वर ही संकल्पना नेहमीच गूढ आणि जिज्ञासेचा विषय राहिली आहे. खरंच आपल्या ब्रह्मांडात ‘परमेश्वर’ नावाची एखादी शक्ती आहे का? आता यासंदर्भात हार्वर्ड विद्यापीठातील खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि एयरोस्पेस इंजिनिअर डॉ. विली सून यांनी एक क्रांतिकारी दावा केला आहे. त्यांच्या मते, गणिताचे एक सूत्र हे ‘भगवानाच्या अस्तित्वाचा अंतिम पुरावा’ असू शकते.
डॉ. सून हे नुकतेच टकर कार्ल्सन नेटवर्क पॉडकास्ट वर सहभागी झाले होते. या चर्चेदरम्यान त्यांनी काही गणितीय सूत्रे मांडली आणि असा दावा केला की, ब्रह्मांडातील रहस्य केवळ तारकांमध्ये नाही, तर गणिताच्या मूलभूत संकल्पनांमध्येही दडलेले आहे. त्यांनी त्यांच्या ‘फाइन ट्यूनिंग आर्ग्युमेंट’ या सिद्धांतावर भर दिला, ज्यानुसार ब्रह्मांडातील नैसर्गिक नियम एवढ्या अचूकतेने संतुलित आहेत की, ते जीवनाच्या अस्तित्वाला समर्थ बनवतात. याला निव्वळ योगायोग मानता येणार नाही, असा त्यांचा दावा आहे. डॉ. सून यांच्या म्हणण्यानुसार, हे सूत्र प्रथम प्रसिद्ध गणितज्ञ पॉल डिराक यांनी मांडले होते. डिराक यांच्या मते, ब्रह्मांडातील काही गोष्टी विलक्षण प्रमाणबद्ध आहेत आणि त्यांचे गणितीय स्पष्टीकरण देता येते. डिराक यांनी असेही सुचवले होते की, ब्रह्मांडाच्या सुस्पष्ट संतुलनाला ‘गणिताच्या परिपूर्ण सौंदर्य आणि शक्तीच्या द़ृष्टिकोनातून‘ परिभाषित करता येते. असे समजून घेण्यासाठी उच्च बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे. सन 1963 मध्ये डिराक यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले होते की, ‘कदाचित आपण असे म्हणू शकतो की, परमेश्वर हा अत्यंत उच्च स्तराचा गणितज्ञ आहे. त्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रगत गणिताचा वापर केला आहे.‘पॉडकास्टमध्ये बोलताना डॉ. सून यांनी डिराक यांच्या सिद्धांताच्या आधारे परमेश्वराच्या अस्तित्वावर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, आपल्या जीवनात सतत उपस्थित असलेल्या शक्तींची अनेक उदाहरणे आहेत. तरीही, अनेक वैज्ञानिकांनी विज्ञान आणि धर्म यांना जोडण्याचे टाळले आहे. ‘गणित आणि ब्रह्मांड यांच्यातील हे आश्चर्यकारक साम्य एक विचारपूर्वक केलेल्या डिझाइनकडे निर्देश करते. देवाने आपल्याला प्रकाश दिला आहे, ज्याचा आपण शोध घ्यावा आणि आपल्या संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करावेत.’