

युट्रेक्ट (नेदरलँड्स) : मंगळ ग्रहावर कधीकाळी जीवन होते का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असला, तरी मंगळावरील पृष्ठभागावरील काही विचित्र भू-आकार शास्त्रज्ञांना सतत विचार करायला लावत आहेत. मंगळ ग्रहावरील वाळूच्या ढिगार्यांमध्ये (ड्यून) आढळलेल्या रहस्यमय खड्ड्यांच्या (ट्रेंचेस) निर्मितीमागील कारण शोधण्यासाठी युट्रेक्ट विद्यापीठातील पृथ्वी वैज्ञानिक डॉ. लोनेके रोएलोफ्स यांनी एक महत्त्वपूर्ण अभ्यास केला. त्यांच्या प्रयोगशाळेतील निष्कर्षांनी या खड्ड्यांच्या निर्मितीमागे गोठलेला कार्बन डायऑक्साईड (कोरडा बर्फ) कारणीभूत असल्याचे सिद्ध केले आहे.
डॉ. रोएलोफ्स यांनी प्रयोगशाळेत कार्बन डायऑक्साईड बर्फाचे तुकडे वापरून यशस्वी प्रयोग केला. ‘ज्या पद्धतीने हे तुकडे स्वतःहून खड्डे खणत होते, ते पाहून मला ‘ड्यून’ चित्रपटातील वाळूच्या महाकाय किड्यांची आठवण झाली,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. हा संशोधनात्मक लेख ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ मध्ये प्रकाशित झाला आहे. गेले अनेक वर्षांपासून, कार्बन डायऑक्साईड बर्फच या विचित्र आकृत्यांसाठी जबाबदार असावा, असा शास्त्रज्ञांना संशय होता; पण तो थेट सिद्ध झाला नव्हता. डॉ. रोएलोफ्स यांनी प्रयोगशाळेत कार्बन डायऑक्साईड बर्फाच्या तुकड्यांचा वापर करून अशा नाल्या तयार केल्या, ज्यामुळे पृथ्वीवर कधीही न होणार्या आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या नैसर्गिक प्रक्रियेची हुबेहूब नक्कल झाली.
मंगळावर हिवाळ्यामध्ये तापमान सुमारे 0 ते -120 अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते, तेव्हा वाळूच्या ढिगार्यांवर बर्फाचा थर जमा होतो. वसंत ऋतू सुरू झाल्यावर सूर्यप्रकाशाने ढिगारे गरम होतात. यामुळे तुटलेले कार्बन डायऑक्साईड बर्फाचे (जे कधीकधी एक मीटरपर्यंत लांब असू शकतात) मोठे तुकडे खाली घरंगळायला लागतात. मंगळाचे वातावरण विरळ असल्यामुळे गरम वाळू आणि बर्फाच्या खालच्या बाजूमध्ये तापमानाचा मोठा फरक निर्माण होतो. त्यामुळे बर्फाच्या तुकड्यांचा खालचा भाग लगेच वायूमध्ये रूपांतरित होतो (या प्रक्रियेला ऊर्ध्वपातन म्हणतात). वायूच्या या दाबामुळे, बर्फाचे तुकडे वाळूवर जलद गतीमध्ये तरंगत किंवा घरंगळत जातात आणि खोल खड्डे तयार होतात.