Ancient Ocean on Mars | मंगळावर कधीकाळी होता अथांग महासागर

Ancient Ocean on Mars |
Ancient Ocean on Mars | मंगळावर कधीकाळी होता अथांग महासागर
Published on
Updated on

पॅरीस : अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळ ग्रहाचा एकतृतीयांश भाग एका विशाल महासागराने व्यापला असावा, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. बाथटबमधील पाणी वाहून गेल्यावर जशी कडेला खूण राहते, तशीच एक सपाट किनारपट्टीची रचना मंगळाच्या पृष्ठभागावर आढळली आहे. ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासाने मंगळावर पाणी असण्याच्या दीर्घकालीन वादाला नवा वैज्ञानिक आधार दिला आहे.

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे भूगर्भशास्त्रज्ञ मायकेल लँब आणि टेक्सास विद्यापीठाचे अब्दुल्ला झाकी यांनी पृथ्वीवरील समुद्र आटल्यास जमिनीवर कोणते बदल होतात, याचे संगणकीय मॉडेल तयार केले. यात ‘कॉन्टिनेन्टल शेल्फ’ (भूखंड मंच) ही रचना दीर्घकाळ टिकून राहिल्याचे स्पष्ट झाले. शास्त्रज्ञांनी नासाच्या ‘मार्स ऑर्बिटर लेसर अल्टीमीटर’च्या डेटाचा अभ्यास केला असता, मंगळावर सुमारे २०० ते ४०० मीटर रुंद असाच एक किनारपट्टीचा पट्टा आढळून आला. नद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि पाण्याच्या लाटांमुळे ही रचना अब्जावधी वर्षे टिकून राहिली आहे.

पुराव्यांची साखळी आणि जुने वाद

मंगळावर १९७० च्या दशकात ‘व्हायकिंग’ मोहिमेदरम्यान प्राचीन किनारपट्टीच्या खुणा दिसल्या होत्या. मात्र, त्या खूप अरुंद आणि असमान असल्याने शास्त्रज्ञांमध्ये एकमत नव्हते. ज्वालामुखीच्या हालचालींमुळे ही रचना बदलली असावी, असा अंदाज होता. आता सापडलेला ‘कोस्टल शेल्फ’ अधिक रुंद असल्याने तो प्राचीन महासागराचा भक्कम पुरावा मानला जात आहे. झुरॉन्ग रोव्हरचे संकेत : २०२१ मध्ये मंगळाच्या उत्तर भागात उतरलेल्या चिनी 'झुरॉन्ग' रोव्हरला जमिनीखाली प्राचीन समुद्रकिनाऱ्यांचे थर आढळले होते.

‘नासा’चे इनसाईट लँडर : मंगळाचे बहुतांश पाणी वातावरणाच्या ऱ्हासामुळे नष्ट झाले असले, तरी त्याच्या अंतर्गत भागात अजूनही महासागर भरेल इतके पाणी असावे, असे संकेत मिळाले आहेत.

भविष्यातील मोहिमा निर्णायक ठरणार

काही शास्त्रज्ञांच्या मते, मंगळावर पृथ्वीसारख्या टेक्टॉनिक प्लेट्स नसल्यामुळे हा पट्टा महासागराचाच आहे का, याबाबत अधिक तपासणीची गरज आहे. ‘‘एवढे पाणी कुठून आले आणि कुठे गेले?’’ हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

युरोपियन स्पेस एजन्सीचे ‘रोझालिंड फ्रँकलिन’ हे रोव्हर मंगळाच्या उत्तर भागात पृष्ठभागाची आणि अंतर्गत रचनेची तपासणी करणार आहे. या मोहिमेमुळे मंगळावर प्राचीन काळी महासागर होता का आणि तिथे कधी जीवन अस्तित्वात होते का, या रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news