वॉशिंग्टन : पृथ्वीचा शेजारी ग्रह असलेल्या मंगळावर एकेकाळी जीवसृष्टीला पोषक स्थिती होती. खडकाळ पृष्ठभाग, योग्य तापमान तसेच वाहते पाणीही होते. मात्र काळाच्या ओघात येथील पाणी नष्ट झाले व मंगळ कोरडा पडला. त्यामागील एक कारण म्हणजे या ग्रहाने आपले चुंबकीय क्षेत्र गमावले. मात्र आतापर्यंतच्या अनुमानानुसार हे चुंबकीय क्षेत्र जितका काळ अस्तित्वात होते असे मानले जात होते, त्यापेक्षा किती तरी अधिक काळ ते टिकून राहिले होते असे एका नव्या संशोधनातून आढळले आहे. नव्या संशोधनानुसार मंगळाचे चुंबकीय क्षेत्र अनुमानापेक्षा 20 कोटी वर्षे अधिक काळ टिकून राहिले.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्रज्ञांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चुंबकीय क्षेत्राच्या ध्रुवांमध्ये झालेल्या अदलाबदलीचा प्रभाव मंगळावर विपरितरित्या पडला. इम्पॅक्ट क्रेटरसारख्या रचनांमुळे कालौघात मंगळाचा मॅग्नेटिक डायनॅमो बदलला असा एक गैरसमज निर्माण झालेला आहे. ही विवरे अन्य खगोलांच्या मंगळाशी झालेल्या धडकेमुळे बनलेली आहेत. हार्वर्ड विद्यापीठाच्या सारा स्टेली यांनी सांगितले की मंगळाच्या इतिहासात नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी एखाद्या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र बरेच काही सूचवत असते. एखाद्या ग्रहाच्या खोलवरील जिओडायनॅमो प्रभावामुळे ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असते. पृथ्वीसारख्या ग्रहाचा विचार करता, हे पृथ्वीच्या आयर्न-निकेल कोअरमुळे बनलेले आहे. या कोअरचे दोन भाग असून एक अंतर्गत भाग हा घनरुप असून बाहेरचा भाग हा वितळलेला आहे. मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या तुलनेत निम्म्या व्यासाचा आहे. सुरुवातीच्या काळात प्रत्येक ग्रहाचा अंतर्गत कोअर हा अत्यंत उष्ण असल्याने वितळलेलाच असतो. तो थंड होत गेला की घनरुप होतो. पृथ्वीच्या तुलनेत मंगळाचा आकार लहान आहे व त्याचा अंतर्गत भागही लवकर थंड झाला. एखाद्या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्रच त्याचे सौरवादळ किंवा हानीकारक अवकाशीय किरणोत्सर्गापासून संरक्षण करीत असते. मंगळाचे चुंबकीय क्षेत्र नष्ट झाल्याने त्याचे वातावरणही नष्ट झाले व त्याबरोबरच संरक्षक कवच नसल्याने हानीकारक अवकाशीय किरणे थेट पृष्ठभागापर्यंत येऊ लागली.