

वॉशिंग्टन ः अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरच्या माध्यमातून मंगळ ग्रहावरील थक्क करणारी माहिती समोर येत आहे. नव्याने केलेल्या संशोधनामध्ये मंगळ ग्रहावर अनेक लहान-मोठ्या टेकड्या आढळून आल्या आहेत. या माध्यमातून मंगळाच्या भूतकाळावर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे. सध्या ‘नासा’चा हा रोव्हर जेजेरो क्रेटरजवळ भटकंती करून माहिती गोळा करत आहे. जेजेरो क्रेटर हा भाग पूर्वी एक तलाव होता, असं वैज्ञानिकांचं म्हणणं असल्याने या भागातील नवं संशोधन मंगळासंदर्भातील सर्व संकल्पना मोडीत काढणारं ठरू शकतं, असं म्हटलं जात आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावरील एका टेकडीच्या उतारावर भ—मंती करत होता. या टेकडीला विच हेजल हिल नावाने ओळखलं जातं. मंगळावरील तापमान सध्याच्या तपमानापेक्षा फार वेगळं होतं तेव्हाची गुपितं या टेकडीत दडल्याचं सांगितलं जातं. एका वृत्तानुसार, मागील काही महिन्यांमध्ये या रोव्हरने पाच टेकड्यांवरील दगड, मातीचे नमुने गोळा केले आहेत. या रोव्हरने आतापर्यंत एकूण पाच टेकड्यांचं सविस्तर परीक्षण केलं आहे, तर 83 टेकड्यांवर लेझरच्या मदतीने चाचण्या केल्या आहेत. मागील चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच रोव्हरने मंगळवारील लँडिंगनंतर इतक्या वेगाने काम केल्याचं, ‘नासा’ने म्हटलं आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामधील नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेमधील पर्सिव्हरन्स रोव्हरच्या प्रकल्पावर काम करणार्या वैज्ञानिक केटी मॉर्गन यांनी एक प्रतिक्रिया नोंदवताना, जेजेरो क्रेटरच्या पश्चिमेकडील भाग हा वैज्ञानिकांसाठी सोन्यासारखा आहे. या ठिकाणी अशा काही टेकड्या आढळून आल्या आहेत, ज्या सर्वात आधी मंगळाच्या गर्भातून वर आल्या आहेत. कदाचित येथील टेकड्यांची निर्मिती उल्कावर्षावामुळे झाली असावी. या उल्कांमध्येच जेजेरो क्रेटर तयार करणार्या उल्केचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं. या रोव्हरला एक खास टेकडी सापडली असून, त्याचं नाव ‘सिल्व्हर माऊंटन’ असं आहे. ही टेकडी जवळपास 3.9 अब्ज वर्ष जुनी असू शकते, असा अंदाज आहे. ज्यावेळेस मंगळावर मोठ्याप्रमाणात उल्कापात होत होता, त्यावेळी या टेकडीची निर्मिती झाली असावी. रोव्हरच्या एक्स अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार, ही टेकडी आतापर्यंतची सर्वात वेगळी टेकडी आहे. या टेकडीपासून जवळच अजून एक टेकडी सापडली असून, त्यामध्ये सर्पेंटाइन नावाचं खनिज आहे. पाणी आणि ज्वालामुखी एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा सर्पेंटाइनची निर्मिती होती. या दोघांच्या एकत्र येण्याच्या क्रियेतून हायड्रोजन गॅसची निर्मिती होते. पृथ्वीवरील जीवनासाठी हायड्रोजन आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे या डोंगरांमधून सापडणारे घटक हे वैज्ञानिकांसाठी सोन्याहून कमी नसल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. सर्पेंटाइन सापडलेल्या टेकडीचा ‘सोन्याची टेकडी’ असा उल्लेख आता केला जात आहे. तसेच या टेकडीवरील दगड-मातीचे नमुने हे मानवाला अंतराळात स्थायिक होण्याच्या द़ृष्टिकोनातून सुरू असलेल्या संशोधनाच्या द़ृष्टीने सोन्यासारखेच असल्याचं सांगितलं जात आहे. या टेडक्यांवरील माती, दगडाचे नमुने पृथ्वीवर आणून मंगळावर खरोखरच कधी काळी जीवन अस्तित्वात होतं का, हे वैज्ञानिकांना तपासून पाहायचं आहे; मात्र हे काम फार कठीण आहे.