Mars Water Loss | मंगळाने ४ अब्ज वर्षांपूर्वीच पाणी गमावण्यास केली होती सुरुवात

मंगळाच्या सर्वात जुन्या उल्केवरून मोठा खुलासा!
Mars Water Loss |
Mars Water Loss | मंगळाने ४ अब्ज वर्षांपूर्वीच पाणी गमावण्यास केली होती सुरुवात
Published on
Updated on

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहाने आपले पाणी आजपासून तब्बल ४ अब्ज वर्षांपूर्वीच गमावण्यास सुरुवात केली असावी, असा नवा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आतापर्यंत सापडलेल्या मंगळग्रहावरील सर्वात जुन्या उल्कापिंडाच्या अभ्यासातून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या संशोधनामुळे मंगळ ग्रहाच्या भूतकाळातील हवामान आणि तिथल्या पाण्याच्या अस्तित्वाबद्दलच्या जुन्या संकल्पनांना मोठा धक्का बसला आहे.

शास्त्रज्ञांनी ‘NWA 7034’ (ज्याला ‘ब्लॅक ब्यूटी’ - Black Beauty म्हणूनही ओळखले जाते) या प्रसिद्ध मंगळग्रहाच्या उल्कापिंडातील खनिजांचे सूक्ष्म परीक्षण केले. हे उल्कापिंड सुमारे ४.४ अब्ज वर्षे जुने मानले जाते. या उल्कापिंडामध्ये असलेल्या झिर्कोन (Zircon) खनिजाच्या स्फटिकांचा आणि हायड्रोजन आयसोटोप्सचा अभ्यास करताना संशोधकांना असे आढळून आले की, त्या काळी मंगळाच्या वातावरणात आणि पृष्ठभागावर पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होत होते.

वैज्ञानिक सिद्धांतानुसार, मंगळ ग्रह सुरुवातीच्या काळात पृथ्वीसारखाच उबदार आणि पाण्याने समृद्ध होता. तिथे नद्या, तलाव आणि कदाचित महासागरही अस्तित्वात होते. परंतु, मंगळ ग्रहाचे अंतर्गत चुंबकीय क्षेत्र ४ अब्ज वर्षांपूर्वी नष्ट होण्यास सुरुवात झाली. चुंबकीय संरक्षण कवच निघून गेल्यामुळे सूर्याकडून येणाऱ्या तीव्र सौर वाऱ्यांनी मंगळाचे वातावरण नष्ट केले. यामुळे मंगळाच्या पृष्ठभागावरील पाणी वाफेच्या रूपात वातावरणात गेले आणि तिथून अंतराळात निघून गेले.

यापूर्वी मंगळावरील पाणी नंतरच्या काळात हळूहळू सुकले असावा असा अंदाज होता. मात्र, ‘ब्लॅक ब्यूटी’च्या अभ्यासाने हे स्पष्ट केले आहे कि, मंगळ ग्रहाची जलसंपदा नष्ट होण्याची ही प्रक्रिया अपेक्षेपेक्षा खूप आधी म्हणजेच ग्रहाच्या निर्मितीनंतरच्या सुरुवातीच्या काही दशलक्ष वर्षांतच सुरू झाली होती. मंगळावर कधीकाळी सूक्ष्मजीव किंवा जीवसृष्टी अस्तित्वात होती का, या प्रश्नाचा शोध घेणाऱ्या खगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी ही नवी माहिती अत्यंत मोलाची ठरणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news