लंडन : प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. पाश्चात्त्य देशांमध्ये याची अनेकवेळा प्रचिती येत असते. तेथील वयस्कर लोक केवळ प्रेमातच पडतात असे नव्हे तर लग्नही करतात. अशीच एक जोडी सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. शंभर वर्षांचे रॉन हेडली आणि 93 वर्षांच्या मेरी हिल यांनी नुकतेच लग्न केले. हे दोघेही आपापले जोडीदार गमावून एकाकी जीवन जगत होते.
एका ग्रुप एक्सरसाईज क्लासमध्ये या दोन वृद्ध जीवांची भेट झाली. दोघांना एकमेकांच्या सहवासात राहणे आवडू लागले. विशेष म्हणजे मेरी यांनी रॉन यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. हेडली यांनी विचारासाठी काही वेळ मागितला आणि कुटुंबीयांशी विचारविनियम केल्यावर दोघांनी आपापल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केअर होममध्येच लग्न केले. हेडली यांना तीन मुले आहेत. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलग्याने सांगितले, वडील शंभराव्या वर्षी पुन्हा विवाहबद्ध होतील असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते! लग्नावेळी दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठी घातली. एकमेकांचा हात हात धरून व व्हीलचेअरवर बसूनच दोघांनी लग्नाचे विधी पार पाडले. हेडली यांनी लग्नानंतर सांगितले की आमचे लग्न हे जगातील सर्वात सुंदर लग्नांपैकी एक आहे!