

डबलिन : जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचे कारण तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणती नवीन घोषणा नसून, त्यांची एक शाही आणि अत्यंत महागडी डील आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी आयर्लंडमधील जुना आणि भव्य असा गॉथिक शैलीतील किल्ला खरेदी केला आहे, ज्याची किंमत अब्जावधी रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
मार्क झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चान यांनी आयर्लंडमधील ‘स्ट्रैनकली कॅसल’ ही ऐतिहासिक वास्तू खरेदी केली आहे. रिपोर्टनुसार, या मालमत्तेची किंमत सुमारे ३.५ कोटी डॉलर (सुमारे ३३५ कोटी रुपये) असण्याचा अंदाज आहे. ‘द आयरिश टाईम्स’नुसार ही किंमत २ कोटी ते ३ कोटी युरोच्या दरम्यान असू शकते, जरी अधिकृत रकमेचा खुलासा करण्यात आलेला नाही. हा शानदार महाल आयर्लंडच्या काऊंटी वॉटरफोर्डमध्ये १७८ हेक्टर म्हणजेच तब्बल ४४० एकरांवर पसरलेल्या भव्य जागेत वसलेला आहे. जेव्हा झुकेरबर्ग आणि त्यांचे कुटुंब आयर्लंडच्या दौऱ्यावर असतील, तेव्हा राहण्यासाठी हे त्यांचे शाही ठिकाण बनेल. या खरेदीचा थेट संबंध मेटा कंपनीशी जोडला जात आहे, कारण मेटाचे युरोपियन मुख्यालय आयर्लंडमध्येच आहे. हा किल्ला आयर्लंडची राजधानी डबलिनमधील मेटाच्या ऑफिसपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मार्क झुकेरबर्ग आणि त्यांचे कुटुंब या ऐतिहासिक वास्तूची काळजी घेण्यासाठी आणि आयर्लंडमध्ये वेळ घालवण्यासाठी खूप उत्सुक आहेत. स्ट्रैनकली कॅसलची निर्मिती १८३० मध्ये माजी कन्झर्व्हेटिव्ह खासदार जॉन कीली यांच्यासाठी करण्यात आली होती.
प्रसिद्ध वास्तुविशारद जेम्स आणि जॉर्ज रिचर्ड पेन यांनी अत्यंत भव्य आणि मोठ्या प्रमाणावर याचे डिझाईन केले होते. ‘द हाऊसेस ऑफ आयर्लंड’ या पुस्तकानुसार, हा महाल इतका मोठा आहे की एकेकाळी याच्या डायनिंग रूमपासून किचनपर्यंत चालत जाण्यासाठीच काही मिनिटांचा वेळ लागायचा. सन २००० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘आरएबी कॅपिटल’चे सहसंस्थापक मायकेल एलेन-बकली आणि त्यांच्या पत्नीने हा किल्ला खरेदी करून याचे नूतनीकरण केले होते. झुकेरबर्ग कुटुंब आता या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करणार असल्याबद्दल जुन्या मालकांनी आनंद व्यक्त केला आहे.