

न्यूयॉर्क : बाल्टिक समुद्रातील एका जुन्या युद्धसामग्री क्षेत्रात संशोधकांनी आश्चर्यचकित करणारा शोध लावला आहे. समुद्री सबमर्सिबलद्वारे वैज्ञानिकांना असे आढळले की, दुसर्या महायुद्धातील स्फोटकांवर खेकडे, मासे, अनिमोनी, स्टारफिश आणि इतर जीव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. जर्मनीतील सेनकेनबर्ग रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधक अँड्रे वेदेनीन यांनी या आश्चर्यकारक शोधाची माहिती दिली आहे. ते सांगतात, आम्हाला अपेक्षा होती की या ठिकाणी जीवसृष्टी कमी आढळेल, पण उलटच दिसले. स्फोटकांवरच जास्त प्रजाती सापडल्या!
बाल्टिक समुद्रात दुसर्या महायुद्धात वापण्यात आलेल्या शस्त्रसामग्रीचे अवशेष अजूनही आढळतात. जर्मनीजवळ या समुद्राच्या पाण्यात तब्बल 1.6 दशलक्ष टन शस्त्रसामग्री अजूनही अस्तित्वात आहे. यात रासायनिक व अण्वस्त्र अवशेषही असू शकतात. ल्युबेकच्या उपसागरात नाझी जर्मनीने वापरलेल्या ‘व्ही-1 फ्लाइंग बॉम्ब’चे अवशेष संशोधनावेळी दिसून आले आहेत. शस्त्रसामग्री असलेल्या समुद्रतळाशी जीवसृष्टी कशी अस्तित्वात आली, या विषयी संशोधक सांगतात, समुद्रतळ प्रामुख्याने चिखल आणि वाळूमुळे सपाट आहे.
या ठिकाणचे दगड आणि खडक 18व्या-19व्या शतकात बांधकामासाठी काढून टाकले गेले होते. कठीण पृष्ठभागाची कमतरता असल्याने स्फोटकांचे धातूचे अवशेष जीवांसाठी आसरा बनले. रसायनांमुळे मानवी हस्तक्षेप कमी असल्याने एक प्रकारचे संरक्षित वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जीवसृष्टी तयार झाली. शास्त्रज्ञ आता या जीवांमध्ये किती प्रदूषण शोषले जाते, ते कितपत पुनरुत्पादन करतात याचा अभ्यास करणार आहेत. ड्यूक विद्यापीठाचे डेव्हिड जॉनस्टन यांनी सांगितले की, मानवाने तयार केलेल्या गोष्टींच्या अवशेषांवर निसर्गाने जगण्याचा मार्ग शोधला आहे हे जीवनाच्या ताकदीचे उदाहरण आहे.