

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’चा वापर करून युरेनस ग्रहाच्या वरच्या वातावरणाचा प्रथमच सविस्तर नकाशा तयार केला आहे. या संशोधनातून युरेनसच्या विचित्र चुंबकीय क्षेत्राबद्दल आणि तिथे चमकणार्या ‘ध्रुवीय प्रकाशाच्या’ (ऑरोरा) अनोख्या वैशिष्ट्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
जेम्स वेब टेलिस्कोपने युरेनसच्या स्वतः भोवती फिरण्याच्या वेगावर 15 तास (युरेनसवरील जवळपास एक पूर्ण दिवस) लक्ष केंद्रित केले. यातून ‘आईस जायंट’ मानला जाणारा हा बर्फाळ ग्रह आपल्या वातावरणात ऊर्जा कशी वितरीत करतो, याचा अभ्यास करण्यात आला. आपल्या सौरमालेतील इतर मोठ्या ग्रहांच्या तुलनेत युरेनसचे चुंबकीय क्षेत्र अत्यंत वेगळे आहे. याचे चुंबकीय ध्रुव त्याच्या भौगोलिक ध्रुवापासून 60 अंशांनी झुकलेले आहेत. यामुळे येथील ध्रुवीय प्रकाश पृथ्वीप्रमाणे फक्त ध्रुवांवर मर्यादित न राहता संपूर्ण ग्रहावर पसरलेला दिसतो.
‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, सूर्याच्या संपर्कामुळे युरेनसच्या वातावरणातील कण कसे ऊर्जावान (आयोनाईज्ड) होतात, याचे आतापर्यंतचे सर्वात तपशीलवार चित्र समोर आले आहे. ग्रहाच्या ढगांपासून साधारण 5,000 कि.मी. उंचीपर्यंत हे संशोधन करण्यात आले. शास्त्रज्ञांना असे आढळले की, सर्वाधिक तापमान आणि कणांची घनता एकाच उंचीवर नसून ती वेगवेगळी आहे. साधारण 4,000 ते 5,000 कि.मी.वर तापमान सर्वाधिक आहे, तर 1,000 कि.मी.वर घनता जास्त आहे. जेम्स वेबने जुन्या संशोधनांच्या त्या दाव्याला पुष्टी दिली आहे की, 1990 च्या दशकापासून युरेनसचे वरचे वातावरण सातत्याने थंड होत आहे.
सध्या युरेनसच्या वातावरणाचे सरासरी तापमान उणे 153 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. ‘युरेनसचे चुंबकीय मंडल सौरमालेतील सर्वात विचित्र मंडळांपैकी एक आहे. वेब टेलिस्कोपने आता हे दाखवून दिले आहे की, या चुंबकीय लहरींचा प्रभाव वातावरणात किती खोलवर जातो.’ असे पाओला तिरंती, मुख्य लेखिका (नॉर्थम्बि—या विद्यापीठ, यूके) यांनी सांगितले. युरेनसच्या उभ्या संरचनेचा इतक्या बारकाईने अभ्यास केल्यामुळे शास्त्रज्ञांना सौरमालेबाहेरील इतर मोठ्या ग्रहांची वैशिष्ट्ये समजून घेण्यास मदत होणार आहे. हे संशोधन भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.