1435 फूट उंचीवरून धडकी भरवणारा स्टंट!
न्यूयॉर्क : उंचीची भीती अनेकांना असते. उंचावरून खाली पाहायचे म्हटले तरी आपल्यापैकी अनेकांना भीती वाटते. अशात कुणी तरी उंच इमारती, लाईट हाऊस किंवा टॅावरवर झरझर चढून जात असेल, तर त्याला यशस्वी चढाई मानण्यात काहीही गैर नाही. लोकांना असलेल्या उंचीच्या भयामुळेच बुर्ज खलिफासारख्या इमारतीवर केलेली चढाई ही लगेच बातम्यांचा विषय ठरते. त्यावर जाऊन फोटो काढणे, हे एखाद्या स्टंटसारखे होऊ लागते. खूप लोकांना असे विचित्र छंद असतात. नुकताच एका तरुणाचा अशाच विचित्र छंदाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओतील तरुण अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट या इमारतीच्या टेरेसवरील अँटेनाच्या टोकावर उभा राहात असल्याचं दिसत आहे. उंचीचा धसका असलेल्या कित्येकांना त्या इमारतीच्या टेरेसवरून साधे खाली वाकून बघणंही जमणार नाही, तिथे हा तरुण मात्र त्यावरील अँटेनावर उभा राहात आहे.
एम्पायर स्टेट इमारत टेरेसवरील अँटेनाच्या टोकावर उभा
1,435 फुटांच्या उंचीवरून केलेला हा स्टंट म्हणजे एक रेकॉर्डच. व्हिडीओतील तरुण हेलिकॉप्टरला जोडलेल्या एका दोरखंडाला धरून अँटेनावर उभा आहे. हा दोरखंड अर्थातच व्हिडीओमध्ये दिसत नाही. तो कुठे उभा आहे ते त्याने स्वतःच कॅप्शनमध्ये सांगितले आहे. तो उभे राहण्याच्या निर्धारित ठिकाणी पोहोचताच हेलिकॉप्टर त्याच्या बाजूने थेट त्याच्या डोक्यावर येऊन पोहोचताना व्हिडीओत दिसत आहे. हे द़ृश्य बघणं अक्षरशः धडकी भरवणारे आहे. हेलिकॉप्टरमधील कॅमेरा त्याच्या उंचीवरून या तरुणाकडे बघतो तेव्हा आजूबाजूच्या इतर इमारतींची फक्त चौकोनी आकाराची डोकी दिसतात. तरुण हेलिकॉप्टरमधून आलेला एक दोरखंड धरून राहतो. आतापर्यंत 2 कोटी 11 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओवर कॉमेंटस् करताना वाटलेली भीती व्यक्त केली आहे. अनेकांनी या तरुणाचे कौतुक केले आहे. एका युझरने ‘हा स्टंट करताना भूकंप झाला तर?’ असा प्रश्न उपस्थित करत लोकांच्या भीतीत आणखी भर घातली आहे.

