

नवी दिल्ली : आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्रेझ वेगाने वाढत आहे. विशेषतः तरुण पिढी तर आपल्या प्रत्येक कामासाठी चॅटजीपीटी, गुगल जेमिनीसह विविध प्रकारच्या एआय टूल्सचा वापर करत आहे. शाळेच्या आणि ऑफिसच्या कामांपासून ते आता खासगी आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठीही लोक एआयवर अवलंबून राहू लागले आहेत. एआयला कोणताही प्रश्न विचारल्यास तो तुमच्या समस्येवर समाधानकारक उत्तरे देतो. त्यामुळेच आता लोकांनी प्रेमसंबंध, करिअरमधील अडचणी आणि मानसिक आरोग्यासारख्या अत्यंत खासगी गोष्टीही एआयसोबत शेअर करण्यास सुरुवात केली आहे; मात्र आता ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी दिलेला गंभीर इशारा एआय वापरकर्त्यांना सावध करणारा आहे.
आजची तरुण पिढी एआय टूल्सचा वापर एखाद्या थेरपिस्ट किंवा कौन्सेलरप्रमाणे करत आहे; मात्र सॅम ऑल्टमन यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, एआयसोबत तुमच्या अत्यंत खासगी गोष्टी शेअर करणे धोकादायक ठरू शकते. एआयसोबतचे तुमचे पर्सनल चॅटस् पूर्णपणे सुरक्षित नाहीत आणि यासाठी अद्याप कोणताही स्पष्ट कायदेशीर आराखडा (लिगल फे्रमवर्क) तयार झालेला नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्टर, वकील किंवा कौन्सेलरसारख्या मानवी तज्ज्ञांशी बोलता, तेव्हा तुमच्यात गोपनीयतेचे कायदेशीर नियम (Legal Privacy Rules) लागू होतात.
डॉक्टर आणि रुग्ण किंवा वकील आणि क्लायंट यांच्यातील संभाषणाला कायदेशीर संरक्षण असते, पण आज लोक एआयसोबत आपल्या सर्वात खासगी गोष्टी, नातेसंबंध, करिअर आणि आयुष्यातील समस्यांवर चर्चा करत आहेत. त्याला कोणतेही कायदेशीर नियम नसल्याने ते धोकादायक ठरू शकते. भविष्यात तुमच्यावर एखादी कोर्ट केस झाल्यास, एआयसोबतचे तुमचे चॅट कोर्टात पुरावा म्हणून सादर केले जाऊ शकते, जे तुमच्यासाठी खूप वाईट ठरू शकते. तुम्ही एखाद्या वकिलावर किंवा थेरपिस्टवर जितका विश्वास ठेवू शकता, तितका विश्वास खासगी गोष्टींसाठी एआयवर ठेवता येत नाही. मात्र, ऑल्टमन यांनी एआयमधील ही एक मोठी त्रुटी असल्याचे मान्य केले आहे आणि ती लवकरात लवकर दूर केली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.