

वॉशिंग्टन : गेल्या अनेक दशकांपासून जगातील सर्वात धोक्यात आलेली परिसंस्था (इकोसिस्टीम) मानली जाणारी ‘खारफुटीची जंगले’ आता जागतिक पातळीवर पुन्हा बहरत असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. या सकारात्मक बदलामुळे किनारपट्टीचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्याबाबत पर्यावरण तज्ज्ञांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहेत.
‘सायन्स’ या जगप्रसिद्ध वैज्ञानिक मासिकात गुरुवारी (४ जून) प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाचे निष्कर्ष गेल्या ४० वर्षांच्या उपग्रहांद्वारे मिळालेल्या डेटावर आधारित आहेत. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, खारफुटीची जंगले अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक लवचिक आणि संकटांशी लढण्यास सक्षम आहेत. विशेष म्हणजे, गेल्या १६ वर्षांत खारफुटीच्या जंगलांचे झालेले पुनरुज्जीवन हे त्यांच्या झालेल्या नुकसानीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. या सुधारणेमुळे, १९८० च्या दशकापासून आतापर्यंत जागतिक स्तरावर खारफुटीच्या एकूण क्षेत्रात केवळ १ टक्का घट झाली आहे. हा आकडा यापूर्वी वर्तवण्यात आलेल्या अंदाजित नुकसानीपेक्षा अत्यंत कमी आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, समुद्रकिनाऱ्यांवरील अनिर्बंध विकास, कोळंबी किंवा जलचरांची शेती आणि इतर शेतीकामांसाठी खारफुटीची जंगले मोठ्या प्रमाणावर तोडली गेली होती. याशिवाय वाढते प्रदूषण आणि समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे येथील गोड्या आणि खाऱ्या पाण्याचा समतोल बिघडला होता, ज्यामुळे या झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. लुईझियाना येथील ट्युलिन युनिव्हर्सिटीचे पोस्टडॉक्टरल स्कॉलर आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक झेन झांग यांनी सांगितले की, ‘‘अनेक दशकांच्या सातत्यपूर्ण नुकसानीनंतर, अखेर आपण खारफुटीच्या बाबतीत जागतिक स्तरावर एक ‘टर्निंग पॉईंट’ (सकारात्मक वळण) पाहत आहोत. यावरून खारफुटीची संकटातून सावरून पुन्हा उभे राहण्याची अफाट क्षमता दिसून येते. तसेच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि किनारपट्टीच्या संरक्षणासाठी निसर्गावर आधारित एक उत्तम पर्याय म्हणून या जंगलांकडे पाहिले जाऊ शकते.’’