Frozen tissue fatherhood | दहाव्या वर्षी गोठवलेल्या ‘उती’मुळे 28 व्या वर्षी होणार पिता

बेल्जियममधील डॉक्टरांची ऐतिहासिक कामगिरी
Frozen tissue fatherhood |
Frozen tissue fatherhood | दहाव्या वर्षी गोठवलेल्या ‘उती’मुळे 28 व्या वर्षी होणार पिता
Published on
Updated on

ब्रसेल्स : कॅन्सर किंवा रक्ताच्या गंभीर आजारांवरील उपचार (किमोथेरपी आणि रेडिएशन) रुग्णाचे प्राण वाचवतात. परंतु, अनेकदा त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात. या उपचारांमुळे पुरुषांमध्ये कायमचे वंध्यत्व येण्याची शक्यता असते. मात्र, बेल्जियममधील डॉक्टरांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. एका 28 वर्षीय तरुणाने, ज्याने वयाच्या 10 व्या वर्षी स्वतःचे ‘टिश्यू’ (उती) सुरक्षित ठेवले होते, तो आता या तंत्रज्ञानामुळे पिता बनू शकणार आहे.

ही गोष्ट 2008 सालची आहे. हा रुग्ण तेव्हा केवळ 10 वर्षांचा होता आणि त्याला ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ हा गंभीर आजार होता. यावर उपचार म्हणून त्याला किमोथेरपी देणे आवश्यक होते. या उपचारांमुळे हा मुलगा भविष्यात कधीही पिता बनू शकणार नाही, याची डॉक्टरांना कल्पना होती. त्यामुळे पालकांच्या संमतीने डॉक्टरांनी त्याच्या एका अंडकोषाचा (वृषण) छोटासा भाग काढून अत्यंत कमी तापमानात गोठवून सुरक्षित ठेवला. भविष्यात प्रगत तंत्रज्ञान येईल आणि याचा वापर करता येईल, या उद्देशाने हे पाऊल उचलले होते. हा तरुण मोठा झाला, त्याचे लग्न झाले आणि त्याला अपत्य हवे होते. मात्र, किमोथेरपीमुळे त्याच्या शरीरात शुक्राणू तयार होणे पूर्णपणे बंद झाले होते.

अशा वेळी त्याने डॉक्टरांना 18 वर्षांपूर्वी सुरक्षित ठेवलेल्या ‘फ्रोजन टिश्यू’चा वापर करण्याची विनंती केली. 2025 मध्ये डॉक्टरांनी एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे तो जुना टिश्यू पुन्हा त्याच्या शरीरात प्रत्यारोपित केला. प्रत्यारोपणाच्या एक वर्षानंतर जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली, तेव्हा त्यांना आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले. शरीरात लावलेल्या त्या जुन्या भागाने आपले काम सुरू केले होते. त्या 18 वर्षांपूर्वीच्या टिश्यूमुळे रुग्णाच्या शरीरात आता जिवंत आणि निरोगी शुक्राणू तयार होत आहेत.

हे शुक्राणू नैसर्गिकरीत्या बाहेर येऊ शकत नसले, तरी डॉक्टर आता आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याला पिता बनवू शकतात. ही बातमी जगभरातील अशा मुलांसाठी महत्त्वाची आहे, जे कॅन्सरसारख्या आजारांवरील उपचारानंतर वंध्यत्वाचे शिकार होतात. बालपणीचे टिश्यू मोठे झाल्यावर वापरता येतात, हे आता या यशस्वी प्रयोगामुळे सिद्ध झाले आहे. बेल्जियममधील या रुग्णालयाने आतापर्यंत सुमारे 3,000 मुलांचे टिश्यू फ्रिज करून ठेवले आहेत, ज्यांच्यासाठी आता पालक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news