

नवी दिल्ली ः हल्ली जेवणासोबतच हॉटेलचं वातावरण, तेथील तामझाम लोकांना महत्त्वाचं वाटतं. याच सध्याच्या वृत्तीचा फायदा एका माणसाने करून घेतला आहे. चहा विकण्यासाठी त्याने अनोखी शक्कल लढवली आहे. या व्यक्तीने तब्बल 7 कोटी 50 लाखांच्या रोल्स-रॉईस मोटारीतून चहा विकला आहे. त्याने रोल्स-रॉईस भाड्याने घेतली आणि या व्यवस्थेला ‘रॉयल चाय’ असे नाव दिले. ज्या पद्धतीने चहा दिला जात होता, ती पद्धत सोशल मीडियावर व्हायरल झाली.
एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये आलिशान गाडी भाड्याने घेण्यापासून ते ग्राहकांना चहा विकण्यापर्यंतची संर्पू्ण माहिती या व्हिडीओत दिली आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणाला, ‘चला बघूया रोल्स-रॉईसमध्ये चहा विकून किती पैसे कमावता येतात.’ या व्यक्तीची दिवसाची कमाई किती आहे, यावर देखील चर्चा रंगली आहे. सुरुवात करण्यासाठी, तो एका आलिशान कार भाड्याने देणार्या दुकानात गेला आणि त्याने एक कार भाड्याने घेतली. त्यानंतर, त्याने आपली कल्पना एका चहा विक्रेत्याला सांगितली आणि महत्त्वाचं म्हणजे तो चहावाला देखील या आयडियामध्ये सहभागी झाला.. मग त्याने तयारी सुरू केली, एक बोर्ड छापला, ग्राहकांसाठी रेड कार्पेट अंथरले आणि चहाबरोबर देण्यासाठी कुकीज आणि बिस्किटांची व्यवस्था केली.
व्हिडिओमध्ये दिसले की ग्राहक उत्सुक आणि उत्साही होते. कुटुंबांसह अनेक जण हा अनुभव घेण्यासाठी आले होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रोल्स-रॉईस कारची किंमत 7.50 कोटी रुपयांपासून (स्पेक्टर मॉडेलसाठी) सुरू होते. व्यवसायाचे मॉडेल सोपे आणि प्रभावी होते. एका कप चहाची किंमत 300 रुपये होती, पण खरी मजा तर ही होती की, जर तुम्हाला आलिशान गाडीत बसून चहा प्यायचा असेल आणि रील्स रेकॉर्ड करायच्या असतील, तर तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागत होते. लोक त्या गाडीकडे आकर्षित होत होते आणि अनेक कुटुंबे तर फक्त तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चहा पीत होती.
अनेकांनी रिल्स बनवून सोशल मीडियावर शेअर केले. दिवस संपला, गर्दी पांगली आणि जेव्हा भाईने त्याच्या ‘महाराणी’ डायरीत हिशेब केला, तेव्हा हिशेब थोडा चुकला. कारचे भाडे, चहाचा पुरवठा आणि पोस्टर्स यांसह एकूण खर्च सुमारे 1,08,000 रुपये झाला होता. चहा विकून मिळणारे उत्पन्न केवळ 88400 रुपयांपर्यंत कमी झाले, म्हणजेच 19600 रुपयांचे थेट नुकसान झाले, पण भाईसाहेब उदार मनाने म्हणाले, ‘पैसे गेले तर काय झाले, निदान लोकांच्या चेहर्यावर आनंद तरी आहे!’