

बीजिंग : चीनच्या सिचुआन प्रांतात राहणार्या 35 वर्षीय मीन हेंगकाईने असा निर्णय घेतला की, तो ऐकून अनेकजण थक्क झाले. त्याने लग्न आणि नोकरी या दोन्ही गोष्टी वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यासारख्या असल्याचे सांगत, गेल्या चार वर्षांपासून एका गुहेत राहायला सुरुवात केली आहे.
मीन यांचा विश्वास आहे की, आजच्या जगात लग्न आणि नोकरी दोन्ही वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्याचे काम आहेत. पूर्वी मीन एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते आणि महिन्याला सुमारे 10,000 युआन (सुमारे 1.2 लाख रुपये) कमावायचे. मात्र, रोज 10 तास काम करण्याचा ताण आणि कर्ज फेडण्याचा ताण त्यांना जीवनापासून निराश करून टाकला. जेव्हा मीन यांनी भौतिक जग सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्यावर सुमारे 42,000 डॉलर (सुमारे 35 लाख रुपये) कर्ज होते. त्यांना वाटले की, ते कधीही हे कर्ज फेडू शकणार नाहीत. नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची मालमत्ता विकून हे कर्ज फेडले.
त्यानंतर मीन यांनी एका गावकर्याकडून त्यांच्या जमिनीच्या बदल्यात एक गुहा मिळवली आणि त्यांच्या 6,000 डॉलर (सुमारे 5 लाख रुपये) बचतीतून 50 चौ.मी. या गुहेला घरात रूपांतरित केले. आता हेच त्यांचे नवीन निवासस्थान आहे. मीनची दिनचर्या अतिशय साधी आहे. ते सकाळी 8 वाजता उठतात, दिवसभर शेती करतात, पुस्तके वाचतात आणि फेरफटका मारतात आणि रात्री 10 वाजता झोपतात. ते मुख्यतः स्वतः शेतात पिकवलेल्या अन्नावरच जगतात आणि फक्त लहान-मोठ्या गरजांसाठीच पैसे खर्च करतात. मीन म्हणतात की, हीच ती जीवनशैली आहे, ज्याचे ते शहरात असताना स्वप्न पाहत होते.
त्यांनी त्यांच्या गुहेला ‘ब्लॅक होल’ असे नाव दिले आहे, जेणेकरून त्यांना स्वतःची नगण्यता आठवत राहील. मीन म्हणतात, ‘लग्न म्हणजे पैसे आणि वेळ वाया घालवणे आहे. खरे प्रेम मिळणे फारच दुर्मीळ आहे, मग त्यासाठी एवढा संघर्ष का करावा?’ जरी मीन यांनी भौतिक जीवन सोडले असले तरी ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते त्यांच्या गुहेतील जीवनाबद्दल नियमितपणे पोस्ट करतात आणि त्यांचे 40,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. काही लोक त्यांना पाखंडी म्हणतात, तर अनेकजण त्यांना आधुनिक संत किंवा विचारवंत मानतात.