

बीजिंग : पाठ खाजवणे हा प्रकार भल्याभल्यांच्या नाकी नऊ आणणाराच आहे. पाठीच्या मध्यभागी खाज होत असेल, तर अनेकजण हाताला जे येईल ते (उदा. पेन, पट्टी, ताकाची रवी, पळी वगैरे) घेऊन पाठीचा कंडू शमवतात. हल्ली ही अडचण लक्षात येऊन सुपीक डोक्याच्या लोकांनी हाताच्या पंज्यासारख्या काठ्या किंवा ‘बॅक स्क्रॅचर’ही बनवून विकण्यास सुरुवात केलेली आहे! अनेक लोक या कामासाठी जवळच्या व्यक्तीची मदतही घेतात. मात्र, चीनमध्ये एका उद्योजकाने पाठ खाजवून देण्याचा व्यवसायच सुरू केला आहे. पैशांच्या मोबदल्यात लोकांची पाठ खाजवून देण्याच्या व्यवसायाला एवढी मागणी आहे की, त्याच्या एका दुकानाची दोन दुकानेही झाली असून, दोन्ही दुकानांवर चांगली गर्दी असते. विशेष म्हणजे यामधून तो दर महिन्याला १ लाख युआन (अंदाजे १४ लाख रुपये) कमावतो.
लोकांना खाजवून देण्याचा हा व्यवसाय शेन्झेनमध्ये ३२ वर्षीय झांग शियाओकियाओने सुरू केला आहे. या दुकानांमध्ये ग्राहकांसाठी खास इचिंग सेशन्स म्हणजेच खाजवून देण्याची विशेष सत्रे आयोजित केली जातात. या सेशन्सदरम्यान प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना मसाज दिला जातो. त्याप्रमाणे पलंगावर झोपवून विविध साधने वापरून हळूवारपणे खाजवतात, असे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
झांगने मे महिन्याच्या सुरुवातीला शेन्झेनच्या बाओआन जिल्ह्यात ‘सुमा’ या ब्रँड नेमने खाजवून देण्याच्या उद्योगाचा श्रीगणेशा केला. त्याने आपले पहिले दुकान उघडल्यानंतर एका महिन्यात फुटीयान जिल्ह्यात दुसरे दुकान सुरू केले. या ठिकाणी येणारे ग्राहक एका तासाच्या सत्रासाठी सुमारे ३०० युआन (अंदाजे ४,२०० रुपये) देतात. कर्मचारी खास डिझाईन केलेली टोकदार नखे परीधान करून ग्राहकांना हळूवारपणे खाजवतात, असे ‘शियाओशियांग मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तात म्हटले आहे. ग्राहकांना आराम करण्यास आणि त्यांची झोप सुधारण्यास मदत करण्याच्या उद्देशाने खाजवून देण्याचा हा उद्योग सुरू केल्याचे झांग यांचे म्हणणे आहे.