

बीजिंग : आयुष्य कधी आणि कोणत्या क्षणी कलाटणी घेईल, हे कुणालाच माहीत नसते. सहसा तरुण मंडळी वयाच्या 18 व्या वर्षी कॉलेज, करिअर आणि नवीन स्वप्नांच्या दुनियेत रमलेले असतात. झेंघुआ यांग मात्र त्यावेळी मृत्यूशी संघर्ष करत होता. युनिव्हर्सिटीतील पहिल्या सेमिस्टरमध्ये असताना, अचानक झालेल्या एका साध्याशा नाकातून रक्त येण्याच्या घटनेने यांगच्या आयुष्याला अत्यंत गंभीर वळण दिले.
डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की, यांगला एक असाध्य आजार झाला असून, यामुळे त्याच्या शरीरातील प्लेटलेटस् वेगाने कमी होत आहेत. त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती की, डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले, ‘तुमच्याकडे फक्त 3 तास शिल्लक आहेत. तरीही तो खचला नाही. मात्र, पुढील 2 वर्षे त्याचा काळ रुग्णालये आणि उपचारांमध्येच गेला.
या कठीण काळात, यांगला सर्वात मोठा आधार मिळाला, तो व्हिडीओ गेम्समधून. लीग ऑफ लीजेंडस्, माईन्क्राफ्ट आणि वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट यांसारखे गेम्स त्याच्या वेदना, भीती आणि चिंता विसरण्याचे माध्यम बनले. याच दरम्यान त्याला एक कल्पना सुचली. जर गेम्स पाहून एखाद्या व्यक्तीला जगण्याची ताकद मिळू शकते, तर मग असे गेम्स का बनवू नयेत जे लोकांचे आयुष्य बदलून टाकतील? असा विचार त्याला सुचला.
याच विचारातून यांगने 1,000 डॉलरच्या (सुमारे 83,000 रुपये) भांडवलातून एका गेमिंग कंपनीची सुरुवात केली. हे एक असे स्टुडिओ आहे, जे फक्त मनोरंजनावर नव्हे, तर भावनात्मक आणि अर्थपूर्ण अनुभवांवर आधारित गेम्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते.
दहा वर्षांहून अधिक काळामध्ये यांगच्या स्टुडिओने सुमारे 70 गेम्स बनवले आहेत. यातील काहींनी जगभर खूप मोठी प्रसिद्धी मिळवली. आज या कंपनीची वार्षिक उलाढाल 80 कोटी रुपये ते 120 कोटी रुपये या दरम्यान आहे. यांगने ‘फॉर्च्यून’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याने असे अनेक प्रकल्प नाकारले की, ज्यातून कोट्यवधी रुपये कमावता आले असते; पण ते प्रकल्प त्याच्या मूळ विचारसरणीशी जुळत नव्हते.