

न्यूयॉर्क : टीम फ्रीडे या अमेरिकन माणसाने मानवतेसाठी काम करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन तब्बल 200 वेळा स्वत:ला सापाचा चावा घेऊ दिला आणि एक अफलातून रोगप्रतिकारशक्ती विकसित केली आहे. फ्रीडे यांच्या रक्तापासून एक ‘अतुलनीय’ अँटिव्हेनम म्हणजे सर्पदंशावरील औषध तयार झाले असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. फ्रीडे यांच्या रक्तात आढळणार्या अँटिबॉडीज विविध प्रजातींच्या प्राणघातक डोसपासून संरक्षण करतात, असे प्राण्यांवरील चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे. सध्याच्या उपचार पद्धतींमध्ये एखाद्याला विषारी साप चावल्यानंतर त्यावरील औषध त्या विशिष्ट प्रजातींशी जुळणे आवश्यक आहे.
मात्र, फ्रीडे यांचे अठरा वर्षांचे हे अद्भुत मिशन, सर्पदंशावर सार्वत्रिक म्हणजे सर्व सापांच्या दंशावर लागू होणारे अँटिव्हेनम शोधण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. जगात सर्पदंशामुळे दरवर्षी जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. शिवाय, याच्या तिप्पट लोकांना सर्पदंशामुळे शरीराचा एखादा अवयव गमवावा लागतो, अथवा त्यांना कायमचे अपंगत्व येते. फ्रीडे यांनी तब्बल 200 हून अधिक सर्पदंश सहन केले आहेत.
सोबतच, जगातील काही सर्वात प्राणघातक सापांपासून बनवलेल्या 700 हून अधिक विषाच्या इंजेक्शनचा सामना केला आहे. यात मांबा, कोब्रा, तैपन्स आणि क्रेटस् यासारख्या सापांच्या अनेक विषारी प्रजातींचा समावेश आहे. संशोधकांनी तयार केलेल्या औषधांचा उंदरांवर प्रयोग करण्यात आला. या औषधामुळे विषारी सापांच्या 19 प्रजातींपैकी 13 प्रजातींच्या प्राणघातक डोसपासून हे प्राणी बचावले. विषारी सापांच्या उर्वरित 6 प्रजातींपासून उंदरांचा मर्यादित स्वरूपाचा बचाव झाला.
सापाच्या विषापासून संरक्षणाचे हे व्यापक स्वरूप आहे, असे संशोधक डॉ. ग्लॅनविले यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते सध्या कोणतेही अँटिव्हेनम उपलब्ध नसलेल्या इलापिडस् सापांच्या संपूर्ण गटाच्या विषापासून हे औषध संरक्षण करते. सध्या संशोधकांची टीम अँटिबॉडिजमध्ये आणखी सुधारणा करण्याच्या प्रयत्नात गुंतली आहे.
या औषधात आणखी चौथा घटक जोडल्यामुळे इलापिडस् नावाच्या सापांच्या विषापासून संपूर्ण संरक्षण मिळू शकते, असा विश्वास त्यांना वाटतो. त्याची चाचपणी ते करत आहेत. सापांचा दुसरा वर्ग म्हणजे वायपर्स. या सापांचे विष न्युरोटॉक्सिन्सपेक्षा रक्तावर हल्ला करणार्या हिमोटॉक्सिन्सवर अधिक अवलंबून असते. एकूणच पाहता सापाच्या विषाचे जवळपास एक डझन व्यापक प्रकार असतात. ज्यामध्ये थेट पेशींना मारणार्या सायटोकॉक्सिनचाही समावेश आहे.