

टोरांटो ः कॅनडाच्या युकॉन प्रांतातील ओल्ड क्रो रिव्हर येथे सापडलेला 2,16,000 वर्षांपूर्वीचा दात हा उत्तर अमेरिकेत सापडलेला सर्वात प्राचीन वुली मॅमथ (केसाळ हत्तीं)चा जीवाश्म असल्याचे नव्या अभ्यासात समोर आले आहे. या शोधामुळे हेही स्पष्ट झाले आहे की, वुली मॅमथ्स उत्तर अमेरिकेत शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा किमान 1 लाख वर्ष आधीच पोहोचले होते.
स्टॉकहोम युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर पॅलिओजेनेटिक्स या संस्थेतील संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक कॅमिलो चाकोन-डुक यांनी सांगितले की, हा जीवाश्म विशेष महत्त्वाचा आहे. कारण, या कालखंडातील बहुतांश मॅमथ जीवाश्म हे वुली मॅमथ नसतात. ‘आमच्या माहितीनुसार, ओल्ड क्रो रिव्हर येथील मॅमथ हा उत्तर अमेरिकेतील असा सर्वात जुना जीवाश्म आहे, ज्याला वुली मॅमथ म्हणून स्पष्टपणे ओळखता येते,’ असे त्यांनी स्पष्ट केले. संशोधकांनी या दातातून डीएनए काढून विस्तृत आनुवंशिक विश्लेषण केले. या अभ्यासात, मॅमथच्या 10 लाखांहून अधिक वर्षांच्या उत्क्रांतीत हरवलेली आणि विसरलेली आनुवंशिक विविधता पुन्हा शोधण्यात आली. स्टॉकहोम युनिव्हर्सिटीच्या निवेदनानुसार, हा डीएनए ‘डीप-टाईम डीएनए’ म्हणून ओळखला जातो, म्हणजेच अतिप्राचीन डीएनए. मात्र, सर्वात जुना डीएनए नमुना रशियातून सापडलेला असून, तो सुमारे 13 लाख वर्षे जुना आहे. मॅमथचे पूर्वज उष्णकटिबंधीय आफ्रिकेतून आले होते आणि ते आजच्या हत्तींचे जवळचे नातेवाईक होते. सुमारे 30 लाख वर्षांपूर्वी हे प्राणी उत्तर गोलार्धात स्थलांतर करू लागले आणि थंड हवामानात जगण्यासाठी हळूहळू अनुकूल होत गेले. या अभ्यासात संशोधकांनी 34 नवीन डीएनए नमुने आधीच्या 200 हून अधिक नमुन्यांसह तपासले.
हे नमुने मुख्यतः सैबेरिया आणि उत्तर अमेरिकेतून गोळा करण्यात आले. संशोधकांनी माइटोकॉन्ड्रियल डीएनए (mitogenomes) चे विश्लेषण केले, जे आईकडून संततीपर्यंत जाणारे जीन असते. नमुन्यांचे वय ठरवण्यासाठी त्यांनी रेडिओकार्बन डेटिंगसह मॉलेक्युलर क्लॉक डेटिंगचा वापर केला. मॉलेक्युलर क्लॉक म्हणजे डीएनए मध्ये वेळोवेळी होणार्या उत्परिवर्तनांच्या (mutations) आधारे वय ठरवण्याची पद्धत. बहुतेक नमुने 50,000 वर्षांपेक्षा जुने नव्हते, जे रेडिओकार्बन डेटिंगच्या मर्यादेत येते. मात्र, त्याहून जुने नमुने डेट करण्यासाठी संशोधकांनी मॉलेक्युलर क्लॉकची एक अधिक अचूक पद्धत विकसित केली. त्यांनी सांगितले की, एका नमुन्याला स्वतंत्रपणे डेट करणे,अनेक नमुने एकत्र करून डेट करण्यापेक्षा अधिक अचूक ठरले. हा शोध फक्त मॅमथच्या उत्क्रांतीसाठीच नव्हे, तर प्राचीन जीवाश्मातील डीएनए संशोधनासाठीही एक मैलाचा दगड ठरतो आहे.