

नवी दिल्ली : भारतात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ तिळगूळ खाण्याचा नसून, त्याला गणिताचा आणि खगोलशास्त्राचा मोठा आधार आहे. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश आणि उत्तरायणाची सुरुवात यांचा अनुभव घेण्यासाठी भारतातील प्राचीन वेधशाळा आजही विज्ञानाचे पुरावे म्हणून उभ्या आहेत.
खगोलशास्त्रीयदृष्ट्या, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला ‘मकर संक्रांत’ म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तर दिशेकडे सरकणे म्हणजेच ‘उत्तरायण’ सुरू होते. प्राचीन काळापासून भारतीय ऋषी-मुनींनी आणि खगोलशास्त्रज्ञांनी या खगोलीय घटनेची अचूक नोंद ठेवण्यासाठी भव्य वेधशाळा उभारल्या होत्या.
या वेधशाळांची माहिती अशी... जंतर मंतर : (जयपूर, राजस्थान) जगातील सर्वात मोठे दगडी सूर्यघड्याळ (समाट यंत्र) येथे आहे. मकर संक्रांतीच्या वेळी सूर्याची अचूक स्थिती येथे मोजता येते. जंतर मंतरः (दिल्ली) राजा जयसिंग द्वितीय यांनी बांधलेली ही पहिली वेधशाळा. येथील ‘मिश्र यंत्र’ वर्षातील सर्वात मोठा आणि लहान दिवस मोजण्यासाठी प्रसिद्ध आहे. वेधशाळा (जीवाजी राव): (उज्जैन, मध्य प्रदेश) उज्जैन हे प्राचीन काळापासून भारतीय खगोलशास्त्राचे केंद्र मानले जाते. येथूनच कर्कवृत्त जाते, त्यामुळे संक्रांतीच्या अभ्यासासाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. कोणार्क सूर्य मंदिरः (ओडिशा) हे मंदिर स्वतःच एक वेधशाळा आहे. मंदिराच्या चाकांवरील आऱ्यांचा वापर करून वेळेची आणि सूर्याच्या स्थितीची अचूक गणना केली जाते.
या वेधशाळांमध्ये ‘राम यंत्र’ आणि ‘जयप्रकाश यंत्र’ यांसारखी साधने आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची सावली नेमकी कशी पडते आणि दिवसाचा काळ कसा वाढत जातो, याचे मोजमाप आजही या यंत्रांच्या सहाय्याने अचूकपणे करता येते. विशेषतः, जयपूरच्या जंतर मंतरमध्ये संक्रांतीच्या वेळी खगोलप्रेमींची मोठी गर्दी होते.