

बीजिंग : युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि पेकिंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, चंद्राच्या रहस्यांनी भरलेल्या दूरच्या बाजूचे अंतरंग, त्याच्या पृथ्वीकडे असलेल्या (जवळच्या) बाजूच्या तुलनेत लक्षणीयरीत्या थंड असू शकते. या शोधाने चंद्राच्या ‘दोन तोंडी’ स्वरूपावर नवा प्रकाश टाकला आहे.
चीनच्या ‘चाँग ए6’ यानाने चंद्राच्या दूरच्या बाजूवरील एका मोठ्या विवरातून गोळा केलेल्या खडक आणि मातीच्या तुकड्यांचे विश्लेषण शास्त्रज्ञांनी केले. या नमुन्यांची तपासणी केल्यावर त्यांना आढळले की, हे नमुने सुमारे 2.8 अब्ज वर्षांपूर्वीचे असून, ते सुमारे 1100 अंश सेल्सिअस तापमानाच्या लाव्हापासून घनरूप झाले होते. यूसीएलच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे सह-लेखक, प्रोफेसर यांग ली म्हणाले, ‘चंद्राची जवळची आणि दूरची बाजू पृष्ठभागावर आणि कदाचित आतूनही खूप वेगळी आहेत. आम्ही त्याला ‘दोन तोंडाचा चंद्र’ असेही म्हणतो. आमचा अभ्यास, प्रत्यक्ष नमुन्यांचा वापर करून, तापमानातील एवढ्या मोठ्या फरकाचा पहिला पुरावा देतो.‘
चंद्राची दूरची बाजू जवळच्या बाजूच्या तुलनेत ज्वालामुखीच्या द़ृष्टीने कमी सक्रिय असल्याचे दिसते, कारण तिची बाह्य कवचाची (Crust) जाडी अधिक आहे आणि तिची जमीन खडबडीत व विवरांनी भरलेली आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, चंद्राच्या दूरच्या भागाच्या अंतरंगामध्ये युरेनियम, थोरियम आणि पोटॅशियम यांसारख्या उष्णता निर्माण करणार्या घटकांची कमतरता आहे. हे घटक सामान्यतः ज्वालामुखीच्या क्रियाकलापांशी जोडलेले असतात. याउलट, चंद्राच्या जवळच्या बाजूला या घटकांचा असामान्यरीत्या जास्त साठा जमा झाला आहे. याच कारणामुळे जवळच्या बाजूवर बेसाल्टचे मोठे मैदान दिसतात, जे प्राचीन ज्वालामुखी उद्रेकाचे संकेत देतात.
चंद्राच्या दोन बाजूंमधील हे मोठे असंतुलन त्याच्या प्रारंभिक इतिहासात झालेल्या मोठ्या टक्करीमुळे आले असावे, ज्यामुळे उष्णता निर्माण करणारे पदार्थ वेगवेगळ्या भागांत विभागले गेले. दुसरा एक सिद्धांत असा आहे की, आजचा चंद्र ज्या दोन लहान चंद्रांच्या टकरीतून बनला, त्या टकरीमुळेही हे असंतुलन निर्माण झाले असावे. बीजिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ युरेनियम जिओलॉजीचे मुख्य लेखक शेंग हे म्हणाले, ‘चंद्राच्या दूरच्या बाजूतून गोळा केलेला हा पहिला नमुना आहे.‘अब्जावधी वर्षांपूर्वीच्या त्याच्या प्रज्वलित उत्पत्तीपासून चंद्र हळूहळू थंड होत आहे. त्यामुळे तापमानातील हा फरक आजही कायम आहे का, याची तपासणी करण्याची आशा शास्त्रज्ञांना आहे.